साऊथॅम्पटन : भारताने वर्ल्ड कप २०१९ मधील आपल्या अभियानाला शानदार सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध साऊथॅम्पटन येथील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंडवर खेळताना भारताच्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी इतिहास घडवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा डाव गडगडला. भारताच्या जलदगती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी आफ्रिकेची दाणादाण उडवून दिली. आफ्रिकेला सुरुवातीला जसप्रित बुमराह याने दोन धक्के दिले. त्यानंतर युजवेंद्र चहलने कमाल करत चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीचा निर्णय महागात पडला. आपल्या पहिल्या तीन षटकांमध्ये बुमराहाने सलामीवीर हाशिम अमलाला ६ धावांवर बाद केले तर क्विंटन डी कॉक याला १० धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि रॉसी वॉन डेर डुसेन यांनी अर्धशतकीय भागिदारी केली. त्यानंतर चहलने दोघांची जोडी फोडली आणि दोघांनाही पॅव्हेलियना रस्ता दाखविला.
भारताने या सामन्यात दोन फिरकीपट्टूंना स्थान दिली आहे. गेल्या २० वर्षातील इतिहासावर नजर टाकली असता या मैदानावर फिरकी गोलंदाजीची कामगिरी जेमतेम राहिली आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून विकेट पटकावल्या आहेत. या मैदानावर फिरकीसाठी चांगले वातावरण नाही असे म्हटले जाते. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या विराट कोहलीने चहल आणि यादवला संघात घेतले आणि त्यातील चहलने संघातील स्थानाला न्याय दिला. त्याने वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या सामन्यात ४ विकेट घेण्याचा भीम पराक्रम केला. तसेच या सामन्यात कुलदीप यादवने १ विकेट पटकावली.
अशी कामगिरी गेल्या २० वर्षात कोणीच केली नाही. त्यामुळे या मैदानावरील इतिहास चहलने बदलला आहे.