हा नव्या भारताचा विजय आहे, पाहा कांगारुंना कसं लोळवलं!

भारतीय संघाने ब्रिस्ब्रेन कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. या विजयासह भारताने पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 

pant
हा नव्या भारताचा विजय आहे, पाहा कांगारुंना कसं लोळवलं!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका विजय
  • भारतीय संघाने मिळवला मोठा विजय
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने कसोटी मालिका टाकली खिशात

ब्रिसबेन: भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कारण ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया टीम इंडियाने करुन दाखवली आहे. चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यातील विजयासह भारताने कसोटी मालिका देखील २-१ ने आपल्या नावावर केली आहे. पहिलाच कसोटी सामना गमविल्यानंतर भारतीय संघ ही मालिका गमावेल असेच सर्वांना वाटत असताना ज्या पद्धतीने भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मालिका विजय मिळवला आहे तो अतिशय खास आहे. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला आहे. 

भारतासाठी हा मालिका विजय फारच मोठा आहे. कारण गेल्या वर्षभरात भारतीय संघ फारसं क्रिकेट खेळलं नव्हतं. त्यातच या मालिकेतील पहिल्याच सामन्याची सुरुवात पराभवाने झाली होती. पण ही मालिका जिंकून भारताने नवा इतिहास रचला आहे. 

दरम्यान, ब्रिसबेनच्या मैदानावर तब्बल ३१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखावी लागली आहे. गेली ३१ वर्ष या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य राहिला होता. पण भारतीय संघाने त्यांची या मैदानावरील विजयाची मालिका खंडीत केली. खरं तर या सामन्यात संघ म्हणून भारताने जबरदस्त कामगिरी केली. प्रत्येक वेळेस संघातील एका तरी खेळाडूने जबरदस्त कामिगरी केली ज्यामुळे भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव:

या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं होतं. यावेळी टी-नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या होत्या. 

भारताचा पहिला डाव:

भारताच्या पहिल्या डावात आघाडीचे पाच फलंदाज बाद झाल्याने अवघ्या १८६ धावांवर तंबूत परतले होते. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असं वाटत असताना शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अतिशय जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतक झळकावून भारतीय संघावर पराभवाचं जे वादळ घोंघावत होतं ते दूर सारलं. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ३३६ धावांपर्यंत मजल मारली त्यामुळे अवघ्या ३३ धावांची आघाडी मिळाली. 

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव:

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. पण त्यांच्या फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाही. त्यामुळे त्यांचा दुसरा डाव हा २९४ धावांवर आटोपला. त्यात ३३ धावांची आघाडी असल्याने त्यांनी भारतासमोर ३२८ धावांचं विजयासाठी आव्हान ठेवलं. यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी करत ५ बळी मिळवले. तर शार्दुल ठाकूरने ४ बळी घेतले. 

भारताचा दुसरा डाव:

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळविण्यासाठी भारताला ३२९ धावांची गरज होती. पण पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कारण सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा अवघ्या ७ धावांवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण सलामीवर शुभमन गिल आणि पुजारा यांनी त्यांच्या या आशेवर पाणी फिरवलं. कारण शुभमनने ९१ धावांची जबरदस्त वेगवान खेळी केली. तर पुजाराने देखील ५४ बहुमूल्य धावा केल्या. तर त्यानंतर आलेल्या कर्णधार रहाणेने देखील २२ चेंडूत झटपट २४ धावा केल्या. पण रहाणे बाद होताच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताला बॅकफूटवर ढकलण्यासाठी तिखट मारा सुरु केला. पण भारताचा तुफानी फलंदाज रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी करत भारताला थेट विजयापर्यंत पोहचवलं. यावेळी भारताने ३ गडी राखून कांगारुवर त्यांच्याच भूमीत विजय मिळवला. दरम्यान, रिषभच्या जबरदस्त खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी