डे नाईट टेस्टसाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये विशेष व्यवस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे होणार आहे. हा डे नाईट स्वरुपातील सामना आहे.

Ind vs Eng, 3rd Test: Floodlights at Motera Stadium programmed to help sighting in twilight period
डे नाईट टेस्टसाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये विशेष व्यवस्था 

थोडं पण कामाचं

 • डे नाईट टेस्टसाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये विशेष व्यवस्था
 • डे नाईट स्वरुपातील सामना, गुलाबी चेंडू, नवी खेळपट्टी, नवे स्टेडियम
 • मोटेरा स्टेडियम आणि खेळपट्टीच्या नूतनीकरणानंतर तिथे पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे होणार आहे. हा डे नाईट स्वरुपातील सामना आहे. हा सामना आजपासून (बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१) सुरू होत आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. अहमदाबादमध्ये होणार असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी मोटेरा स्टेडिमय येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ४ मार्च पासून चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथेच खेळवला जाईल. चौथी कसोटी ही चेन्नईत झालेल्या पहिल्या दोन कसोटींप्रमाणेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी खेळवली जाईल. (Ind vs Eng, 3rd Test: Floodlights at Motera Stadium programmed to help sighting in twilight period)

डे नाईट स्वरुपातील सामना, गुलाबी चेंडू, नवी खेळपट्टी, नवे स्टेडियम अशा भारदस्त वातावरणात अहमदाबादमध्ये तिसरी कसोटी रंगणार आहे. मोटेरा स्टेडियम आणि खेळपट्टीच्या नूतनीकरणानंतर तिथे पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. यामुळे दोन्ही संघांसाठी हा एक नवा अनुभव आहे.

डे नाईट स्वरुपातील सामन्यात सूर्यास्ताच्यावेळी फ्लड लाईट सुरू केले जातात. कृत्रिम प्रकाशात खेळ पुढे सुरू होतो. पण थोडा वेळा जेव्हा सूर्याचा मर्यादीत प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश असे दोन्ही असते त्यावेळी अनेकदा चेंडूवर सावली पडते. यामुळे फलंदाजाला दुरून चेंडूचा अंदाज घेणे कठीण जाते. तसेच क्षेत्ररक्षकाला दूरून येणाऱ्या चेंडूची स्थिती ओळखून क्षेत्ररक्षण करताना त्रास होतो. ही समस्या ओळखून अहमदाबादमध्ये मोटेरा स्टेडिमय येथे विशेष व्यवस्था केली आहे. 

सूर्यास्ताच्यावेळी फ्लड लाईट सुरू केले तरी चेंडूवर सावली पडणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली आहे. यासाठी स्टेडियमचे काम सुरू असताना दीर्घकाळ दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या नोंदी करण्यात आल्या. सूर्याच्या सावलीच्या बदलत्या स्थितीचा नियमित आढावा घेण्यात आला. यानंतर फ्लड लाईटटे नियोजन करण्यात आले. यामुळे सूर्यास्ताच्यावेळी सूर्याचा मर्यादीत प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश यांचे मिश्रण होईल. खेळाडूंना चेंडू व्यवस्थित दिसेल. चेंडूवर सावली पडण्याचा त्रास होणार नाही.

खेळपट्टी नवी असल्यामुळे दोन्ही संघांसाठी अनोळखी स्थिती आहे. या अशा वातावरणात सूर्यास्ताच्यावेळी तास-दीड तास खेळावे लागले आणि गुलाबी चेंडूचा अंदाज घेत फलंदाजी करावी लागली तर मैदानावर उभे राहणे खूप कठीण आहे. एक वेळ फिरकीपटूंचा अंदाज घेऊन खेळता येईल पण वेगवान गोलंदाजीला सामोरे जाणे या वेळेत कठीण असते. 

सूर्यप्रकाशात खेळणे सोपे आहे. पण सूर्याच्या प्रकाशातून कृत्रिम प्रकाशाकडे असा प्रवास सुरू होतो त्यावेळी डोळ्यांना प्रकाश व्यवस्थेशी नव्याने समतोल साधावा लागतो. चेंडूचा अंदाज घेत खेळ खेळावा लागतो. सकाळी पहिल्या सत्रात जसा खेळाडूंना स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागतो. तसाच प्रकार सूर्यास्ताच्या सुमारास आणि सूर्यास्तानंतर थोडा वेळ होतो. या कालावधीत चेंडूचा अंदाज खेळणे हे मोठे आव्हान असते. चेंडू गुलाबी रंगाचा असेल तर आव्हान आणखी गुंतागुंतीचे होते. पण अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भरपूर प्रकाश पडेल अशी व्यवस्था आहे. जेव्हा नैसर्गिक प्रकाशाची तीव्रता कमी होईल त्यावेळी पुरेसा कृत्रिम प्रकाश केला जाईल. चेंडूवर सावली पडू नये यासाठी पुरेशी खबरदारी घेऊन विशिष्ट कोनातील फ्लड लाईट टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. ही स्वयंचलित व्यवस्था आहे. सूर्यप्रकाश कमी होऊ लागल्यावर आपोआप फ्ल़ लाईट कार्यरत होत जातील. यामुळे इतर स्टेडियमच्या तुलनेत मोटेरावर खेळताना कमी त्रास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत पार पडले. पहिला सामना इंग्लंडने आणि दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी अहमदाबादमध्ये होणार असलेले दोन्ही कसोटी सामने जिंकणे अथवा यातील एक सामना जिंकून दुसरा सामना अनिर्णित राखणे भारतासाठी आवश्यक आहे. 

मोटेरा स्टेडियमचे वैशिष्ट्यः 

 1. अंडाकृती आकाराचे स्टेडियम
 2. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम
 3. स्टेडियमवर ११ खेळपट्ट्या
 4. सहा लाल मातीच्या आणि पाच काळ्या मातीच्या खेळपट्ट्या
 5. प्रत्येक खेळपट्टीच्या चहूबाजूला समान अंतरावर बाउंड्री अर्थात सीमारेषा
 6. अत्याधुनिक प्रकाशयोजना, फ्लड लाईटची दर्जेदार स्वयंचलित व्यवस्था
 7. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची आरामदायी आणि प्रशस्त व्यवस्था
 8. सामना संपल्यावर सर्व प्रेक्षक ३० मिनिटांत बाहेर पडू शकतील अशी व्यवस्था

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी