विश्वचषकाआधी भारतीय संघाचा पहिल्याच सराव सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 25, 2019 | 22:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

ind vs nz: विश्वचषक स्पर्धेआधी खेळविण्यात आलेल्या पहिल्याच सराव सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. 

kohli_AP
विश्वचषकाआधी भारतीय संघाचा पहिल्याच सराव सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव  |  फोटो सौजन्य: AP

लंडन: विश्वचषकाआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण आज (शनिवार) झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी लंडनच्या ओव्हल मैदानावर जबरदस्त कामगिरीर करत भारताच्या विराट सेनेला पराभूत केलं. या सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण की, किवी गोलंदाजांनी ३९.२ षटकातच भारताचा संपूर्ण डाव आटोपला. त्यामुळे भारताने फक्त १७९ धावांपर्यंतच मजल मारली. तर हे माफक आव्हान न्यूझीलंडने ३७.१ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात सहजपणे पार केलं. ३० मेपासून विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. त्याआधी प्रत्येक संघाला दोन-दोन सराव सामने खेळायला मिळणार आहेत. आता पहिल्याच सराव सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने दुसरा सराव सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताचा दुसरा सराव सामना हा मंगळवारी बांगलादेशसोबत असणार आहे. 

भारताकडून सर्वाधिक धावा या रवींद्र जडेजा (५४) याने केल्या. त्याने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय रोहित शर्मा (२), शिखर धवन (२), विराट कोहली (१८), लोकेश राहुल (६), हार्दिक पांड्या (३०), दिनेश कार्तिक (४), महेंद्र सिंह धोनी (१७), भुवनेश्वर कुमार (१) आणि कुलदीप यादव १९ धावा करून बाद झाले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने चार तर जिमी नीशम यांनी तीन विकेट घेतल्या. तर टीम साऊदी आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोम यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले. 

भारताची खराब सुरुवात: 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारच वाईट झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे झटपट बाद झाले. रोहितने ६ चेंडूत २ धावा केल्या तर धवन देखील ७ चेंडूत दोनच धावा करू शकला. दोघांनाही ट्रेंट बोल्टनेच बाद केलं. रोहित शर्मा दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. बोल्टचा एक भन्नाट चेंडू रोहित शर्माला चकवून त्याच्या पॅडवर आदळला. त्यामुळे त्याला पंचांनी पायचीत ठरवलं. 

यानंतर भारताचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघ फारच कमी धावसंख्या उभारू शकला. कर्णधार विराट कोहली हा देखील १८ धावाच करू शकला. तर महेंद्रसिंह धोनी देखील १७ धावांवर बाद झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो देखील ३० धावांवर बाद झाला. यामुळे भारताला जास्त धावा करता आल्या नाही. 

न्यूझीलंडची चांगली कामगिरी:

दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमन्सन याने ६७ धावा केल्या तर रॉस टेलरने ७१ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतावर अगदी आरामात विजय मिळवला. 

सराव सामन्यातील दोन्ही संघ: 

भारत (बॅटिंग इलेव्हन, फील्डिंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल

न्यूझीलंड (बॅटिंग इलेव्हन, फील्डिंग इलेव्हन): केन विलियमसन (कर्णधार), कॉलिन मुनरो, मार्टिन गप्टिल, टाम ब्लंडेल (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, हेनरी निकोल्स, जिमी नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्‍यूसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी आणि ईश सोढी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
विश्वचषकाआधी भारतीय संघाचा पहिल्याच सराव सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव Description: ind vs nz: विश्वचषक स्पर्धेआधी खेळविण्यात आलेल्या पहिल्याच सराव सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola