World Cup 2019, IND vs NZ: ही बातमी देताना दु:ख होतंय... पण खरंच भारत पराभूत झालाय!

World Cup 2019, IND vs NZ: विश्वचषक २०१९ मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचं विश्वचषक पटकावण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

Kohli_bat_throw_AP
ही बातमी देताना दु:ख होतंय... पण खरंच भारत पराभूत झालाय!  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • विश्वचषक स्पर्धेत भारत सलग दुसऱ्यांदा उपांत्य सामन्यात पराभूत
  • २०१५ विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागला होता पराभव
  • इंग्लंडमध्ये पुन्हा विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं.

मेन्चेस्टर: World Cup 2019, IND vs NZ: विश्वचषक २०१९ मधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. होय... खरं तर ही बातमी देताना दु:ख होत आहे. पण विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारत पराभूत झाला आहे.  न्यूझीलंडने ५० षटकात भारतासमोर २४० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण संपूर्ण भारतीय संघ २२१ धावांवरच बाद झाला. यामुळे विश्वचषकातील भारताचा प्रवास इथेच संपला. तर या विजयामुळे न्यूझीलंड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. भारतीय संघाची सुरुवात फारच वाईट झाली. कारण अवघ्या ५ धावांवर भारताने आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. यामुळेच न्यूझीलंडने हा सामना भारताच्या हातून अक्षरश: खेचून घेतला. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सेमीफायनलचा सामना खरं तर काल (मंगळवार) सुरु झाला होता. पण काल न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कालचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काल जिथे सामना थांबला होता तिथूनच आज पुन्हा सामना सुरु करण्यात आला. यावेळी न्यूझीलंडने २३९ धावा केल्या. सुरुवातीला भारत हा सामना आरामात जिंकेल असं वाटलं होतं. पण डावाच्या सुरुवातीलाच भारताचा सलामीवीर रोहित हा बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील अवघा १ रन करुन बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि दिनेश कार्तिक हे देखील झटपट बाद झाले. यामुळे भारताची अवस्था २१ धावा आणि ४ बाद अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दोघंही ३२-३२ धावा करुन बाद झाले. यावेळी दोघेही चुकीचे फटके मारून तंबूत परतले. 

यानंतर मैदानात आलेल्या धोनी आणि जाडेजाने अतिशय संयमी पण आवश्यक अशी फटकेबाजी करत भारताला विजयासमीप नेण्याचा अटोकाट प्रयत्न केला. रवींद्र जडेजाने ५९ चेंडूत ७७ धावा करत भारताचा विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण बोल्टला एक जोरदार फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर सगळ्यांच्याच नजरा या धोनीवर होत्या. पण धोनी दुर्दैवीरित्या धावबाद झाला. यावेळी त्याने ७२ चेंडूत आपलं अर्धशतकही झळकावलं. पण या अर्धशतकाला पराभवाची किनार असल्याने धोनीने ते मैदानात साजरंही केलं नाही. 

दरम्यान, संपूर्ण सामन्यात किवी गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. मॅट हेन्रीने आपल्या १० षटकात फक्त ३७ धावा धेत ३ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने देखील २ महत्त्वाचे फलंदाज बाद केले.  तर फिरकीपटू सँटनरने देखील २ गडी तंबूत धाडले. अतिशय चुरशीच्या या सामन्यात न्यूझीलंडने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावून विजय मिळवत थेट फायनलमध्ये धडक मारली. 

भारताच्या सलामीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच इंग्लंडमध्ये पुन्हा विश्वचषक जिंकण्याचं भारताचं  स्वप्न धुळीस मिळालं. भारताच्या या पराभवानंतर संपूर्ण देशावर एक प्रकारची शोककळा पसरली आहे. पण येत्या काळात भारत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल याबाबत कुणाचंही दुमत नाही. त्यामुळे भारतीय संघाला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019, IND vs NZ: ही बातमी देताना दु:ख होतंय... पण खरंच भारत पराभूत झालाय! Description: World Cup 2019, IND vs NZ: विश्वचषक २०१९ मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचं विश्वचषक पटकावण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola