IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम.चिन्नस्वामी मैदानावर (M. Chinnaswamy stadium) खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगळुरू शहरात आज पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे अंतिम सामन्यात वरुण राजा जोरदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सध्या मालिकेत 2-2 गुणांसह बरोबरीत असल्याने आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर तो संघ संपूर्ण मालिका आपल्या नावार करेल. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पण आता या सामन्यावर पावसाचं सावट उभ ठाकलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभर पाऊस ये-जा करण्याची शक्यता असून तापमान 27 अंश डिग्री सेल्सियस असेल. यावेळी 88 टक्के पावसाची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खास नसल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत इंडियाने इथे 5 टी20 सामने खेळले असून केवळ दोनच जिंकले आहेत. तीन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाने अंतिम टी20 सामना याठिकाणी सप्टेंबर, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. त्यावेळी भारत 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला होता.