U19 World Cup 2022 | नवी दिल्ली : सध्या वेस्टइंडिजमध्ये (West Indies) अंडर-१९ विश्वचषकाचा थरार रंगला आहे. दरम्यान या विश्वचषकातील साखळी सामन्यांची सांगता झाली आहे. त्यामुळे आता उपांत्यपूर्व (Quarter Final) फेरीसाठी ८ संघाची नावे निश्चित झाली आहेत. तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही शेवटच्या आठमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे बहुचर्चित अशी भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आशिया खंडातील या दोन्ही संघानी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन्हीही संघानी स्पर्धेतील तीन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. (India and Pakistan reached the quarter finals of the U19 World Cup).
दरम्यान आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पाकिस्तानचा सामना २८ जानेवारीला ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia)होणार आहे. तर भारताची लढत २९ जानेवारीला बांगलादेशविरूध्द (India vs Bangladesh) होणार आहे. याशिवाय उपांत्यपूर्व फेरीमध्ये श्रीलंका विरूध्द अफगाणिस्तानचा (Sri lanka vs Afghanistan) सामना २७ जानेवारीला तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यातील सामना २६ जानेवारीला होणार आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारताने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा अंडर-१९ विश्वचषकाचा किताब पटकावला आहे. तर यंदाही भारतीय संघाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर उपांत्यफेरीत त्यांचा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील विजेत्या संघाशी होईल. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येणार नाहीत. मात्र दोन्ही संघानी आपापल्या फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर फायनलमध्ये दोन्ही संघ आमनेसामने पाहायला मिळू शकतात.
भारत आणि पाकिस्तानच्या संघानी उपांत्यफेरीच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांची फायनलमध्ये लढत होऊ शकते. दरम्यान चालू विश्वचषकाचा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला होणार आहे. क्रिकेट विश्वात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या संघात या स्पर्धेत आतापर्यंत १० सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रत्येक संघाने ५-५ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे जर यंदाही दोन्ही संघ आमनेसामने आले तर दोन्हीतील एक संघ विजय आघाडी घेईल.