India open 2022 Lakshya Sen beats world champion Loh Kean yew in final : नवी दिल्ली : के. डी. जाधव स्टेडियममध्ये झालेल्या इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या लक्ष्य सेनने बाजी मारली. लक्ष्यने वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन य्यूचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. सिंगापूरच्या लोह कीन य्यूचा पराभव करुन लक्ष्यने इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.
लोह किदाम्बी श्रीकांतचा डिसेंबरमध्ये पराभव करून वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. तर लक्ष्य २०२१च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये श्रीकांत विरुद्ध हरल्यामुळे कांस्य पदकाचा (ब्राँझ मेडल) मानकरी झाला होता.
लक्ष्यचा विजय साजरा करण्याआधी भारतीय बॅडमिंटनप्रेमींनी आणखी एक विजय साजरा केला. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा अंतिम सामना जिंकला. भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेतियावान या जोडीचा २१-१६, २६-२४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.