लॉर्ड्स नाही साउथम्पटनमध्ये होणार भारत-न्यूझीलंड कसोटी

कोरोना संकटामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम कसोटी सामना लॉर्ड्सऐवजी साउथम्पटन येथील रोझ बोल (एजेस बोल / हँपशायर बोल) येथे खेळवला जाणार आहे.

India Vs New Zealand ICC World Test Championship Final To Be Played At Ageas Bowl In Southampton
लॉर्ड्स नाही साउथम्पटनमध्ये होणार भारत-न्यूझीलंड कसोटी 

थोडं पण कामाचं

  • लॉर्ड्स नाही साउथम्पटनमध्ये होणार भारत-न्यूझीलंड कसोटी
  • अंतिम सामन्यात भारत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देणार
  • अश्विन विक्रमापासून ३ बळींच्या अंतरावर

मुंबईः भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम कसोटी सामना १८ जून ते २२ जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. आधी हा सामना लॉर्ड्सवर होणार होता. मात्र कोरोना संकटामुळे आता सामना साउथम्पटन येथील रोझ बोल (एजेस बोल / हँपशायर बोल / Rose Bowl / Ageas Bowl / Hampshire Bowl) येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये काही वेळा येणारा पावसाचा व्यत्यय डोळ्यापुढे ठेवून राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. (India Vs New Zealand ICC World Test Championship Final To Be Played At Ageas Bowl In Southampton)

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बदलाची माहिती दिली. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा कसोटी मालिकांमध्ये पराभव करुन भारत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळवण्यात आली. स्पर्धेला कोरोना संकाटाचा मोठा फटका बसला. यामुळे या स्पर्धेत प्रत्येक संघाच्या जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीत मोजण्याला प्राधान्य देण्यात आले. स्पर्धेच्या नियमानुसार भारताने २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी ७२.२ टक्के सामने जिंकले. स्पर्धेत सहभागी संघांमध्ये सर्वाधिक विजय मिळवत भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडने २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी ७० टक्के सामने जिंकले. या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीत फक्त एक कसोटी सामना आहे. हा सामना जिंकल्यास विजयी संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विजेता ठरेल. पण सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना कामगिरीच्या आधारे गुण दिले जातील. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजयी ठरेल. 

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत फेब्रुवारी-मार्च २०२० दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेतील दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले होते. हे सामने न्यूझीलंडमध्ये झाले होते. यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या कामगिरीचा विचार केल्यास भारताच्या तुलनेत न्यूझीलंड वरचढ दिसत आहे. पण भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

अंतिम सामन्यात भारत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देणार

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा हे खेळाडू २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले नव्हते. या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हा एक प्रकारचा वर्ल्ड कपच आहे; असे रविचंद्रन अश्विन म्हणाला. अंतिम फेरीत तीन कसोटी सामने हवे होते. पण फक्त एकच सामना आहे. यामुळे एकुलत्या एक कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आमचा भर राहील, असेही अश्विन म्हणाला. त्याने अंतिम सामन्यात भारत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देईल, असा विश्वास व्यक्त केला. 

अश्विन विक्रमापासून ३ बळींच्या अंतरावर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल सहा गोलंदाजांमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन आणि न्यूझीलंडचा टिम साउदी हे दोन गोलंदाज आहेत. इतर गोलंदाज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचे आहेत. यामुळे सर्वाधिक बळी मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज होण्याची सुवर्णसंधी अश्विनकडे चालून आली आहे. ही संधी साधण्यासाठी त्याला किमान ३ बळी घ्यावे लागतील. हे तीन बळी घेताच तो पहिल्या क्रमांकावरील पॅट कमिन्सच्या बळींशी बरोबरी करेल. चौथा बळी मिळवताच तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा (२०१९ - २०२१)

  1. पॅट कमिन्स - ऑस्ट्रेलिया - १४ कसोटी सामने - ७० बळी
  2. स्टुअर्ट ब्रॉड - इंग्लंड - १७ कसोटी सामने - ६९ बळी
  3. रविंचंद्रन अश्विन - भारत - १३ कसोटी सामने - ६७ बळी
  4. नॅथन लिऑन - ऑस्ट्रेलिया - १४ कसोटी सामने - ५६ बळी
  5. टिम साउदी - न्यूझीलंड - १० कसोटी सामने - ५१ बळी
  6. जोश हेझलवूड - ऑस्ट्रेलिया - ११ कसोटी सामने - ४८ बळी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी