Virat Kohli: कोहली म्हणतो, ‘वर्ल्ड कपच्या फॉरमॅटचा विचार करायला हवा!’

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 16:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Virat Kohli: विजेत्यांच्या थाटात वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये अतिशय नाट्यमयरित्या संपुष्टात आला. पराभवानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं वर्ल्ड कपमध्ये बदल सुचवले आहेत.

Virat Kohli
पराभवानंतर विराट कोहली निराश  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • सेमीफायनलमधील पराभवानंतर विराट कोहली नाराज
  • पराभव वेदना देणारा; पण स्वीकारायला हवा : विराट
  • वर्ल्ड कप फॉर्मेट बदलाचा विचार व्हावा : विराट

लंडन : महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या झुंजार खेळीनंतर बुधवारी भारतानं न्यूझीलंड विरुद्धची सेमीफायनल गमावली. या एका पराभवामुळं तमाम भारतीयांच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय. संभाव्य विजेत्यांच्या थाटात वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये अतिशय नाट्यमयरित्या संपुष्टात आला. भारतीय खेळाडूंबरोबर कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना या पराभवामुळं निराश व्हावं लागलं आहे. या पराभवानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं आयसीसीला वर्ल्ड कप फॉरमॅटमध्ये काही बदल करण्याचे सूचविले आहे. अर्थात भारताचे २००७मध्ये आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते. त्यावेळीही लीग फॉरमॅटवर टीका झाली होती. कारण, प्रत्येक संघाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तीनच मॅच मिळाल्या होत्या. त्यानंतर आयसीसीनं असा फॉरमॅट पुन्हा तयार न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने लीग मॅचेस झाल्या. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक टीमला नऊ मॅच खेळायला मिळाल्या. आता विराटने नॉक आऊट राऊंडमध्येही बदल करण्यासाठीचा पर्याय सुचवला आहे.

आयपीएलसारखा फॉरमॅट हवा

न्यूझीलंड विरुद्धचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी लागला आहे. आगामी २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम टप्प्यातील बदल केले जाऊ शकतात, असं विराटनं म्हटलंय. विशेष म्हणजे आगामी वर्ल्ड कप भारतात होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये आयपीएलसारखे मॉडेल राबवले गेले पाहिजे का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला होता. कारण पॉइंट्स टेबलमधील पहिल्या क्रमांकावरील टीमला फायनलसाठी दोन संधी दिल्या जातात. त्यावर कोहली म्हणाला, ‘कदाचित विचार करायला हवा. अशा पद्धतीच्या गोष्टींवर लक्ष दिले जाईल. स्पर्धेचे गांभीर्य लक्षात घेता ते योग्यच आहे. मला माहिती नाही, की हे असं लागू होईल की नाही. ’

पराभव स्वीकारायलाच हवा

कोहली म्हणाला, ‘तुम्ही गुण तक्त्यात पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी मेहनत घेता आणि सेमीफायनलमध्ये एक सेशन खराब खेळल्याने थेट बाहेर होता. पण, तुम्हाला हे स्वीकार करावं लागेल.’ सेमीफायनलचा पराभव जिव्हारी लागल्याचं कोहलीनं मान्य केलं. तो म्हणाला, ‘आता या स्टेजला तुम्ही आधी काय केलंय याचा विचार कोणी करणार नाही. आता हा नवीन दिवस आहे नवी सुरुवात आहे. तुम्ही चांगला खेळ केला नाही तर, तुम्हाला घरी जावे लागेल. स्पर्धेत आम्ही खूपच चांगला खेळ केला होता. पण, केवळ ४५ मिनिटांच्या खराब खेळाने आम्ही बाहेर झालो. मी खूपच निराश झालो आहे. तुम्ही स्पर्धेत खूप मेहनत घेता आणि शेवट असा होतो याने निराश व्हायला होते.’ आम्ही दुःखी आहोत. पण, आम्ही कोसळलेलो नाही. कारण स्पर्धेत आम्ही चांगला खेळ केला. सेमीफायनलमध्ये चांगला खेळ केला नाही आणि आम्ही बाहेर झालो. हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. आम्ही आव्हान पेलू शकलो नाही. दबावाखाली चांगला खेळ केला नाही आणि आम्ही हे स्वीकारतो. अर्थात स्कोअर बोर्डवर ते दिसतेही, असे कोहली म्हणाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Virat Kohli: कोहली म्हणतो, ‘वर्ल्ड कपच्या फॉरमॅटचा विचार करायला हवा!’ Description: Virat Kohli: विजेत्यांच्या थाटात वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये अतिशय नाट्यमयरित्या संपुष्टात आला. पराभवानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं वर्ल्ड कपमध्ये बदल सुचवले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola