IND vs SA, 3rd T20: दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर विजय

India vs South Africa, 3rd T-20I: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने ही मॅच जिंकल्यामुळे सीरिज ड्रॉ झाली आहे.

india vs south africa 3rd t20 international bangalore chinnaswamy stadium sports cricket
दक्षिण आफ्रिका टीम   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव
  • दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने विजय
  • तीन मॅचेसची टी-20 सीरिज ड्रॉ

बंगळुरू: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 सीरिजमधील तिसरी मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. या विजयासोबतच तीन मॅचेसची सीरिज 1-1 ने ड्रॉ झाली आहे. पहिली टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली होती. त्यानंतर मोहाली येथे झालेली दुसरी टी-20 मॅच टीम इंडियाने जिंकली होती तर तिसरी मॅच आता दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 134 रन्स केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमने हे आव्हान 17 ओव्हर्समध्ये गाठत विजय मिळवला.

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून शिखर धवन व्यतिरिक्त कुठल्याही बॅट्समनला चांगला स्कोअर करता आला नाही. शिखर धवनने 25 बॉल्समध्ये 36 रन्सची खेळी खेळली. रवींद्र जाडेजा आणि रिषभ पंत या दोघांनी 19-19 रन्सची इनिंग खेळली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 134 रन्सपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने तीन विकेट्स घेतल्या तर हेंड्रिक्स आणि फॉर्टेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमची सुरुवातच चांगली झाली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने एक विकेट गमावत विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकन टीमचा कॅप्टन क्विंटन डिकॉक याने 52 बॉल्समध्ये 79 रन्सची शानदार इनिंग खेळली. डिकॉकने खेळलेल्या या इनिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियावर अगदी सहज विजय मिळवता आला. डिकॉकने या सीरिजमधील दुसरी हाफसेंच्युरी केली आहे. डिकॉकने खेळलेल्या या इनिंगमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सरचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून हेंड्रिक्स आणि क्विंटन डिकॉक यांनी इनिंगची सुरुवात केली. दोघांनीही आपल्या इनिंगची सुरुवात धडाकेबाज बॅटिंग करत केली आणि पहिल्या १० ओव्हर्समध्ये विकेट न गमावता 76 रन्स केले. 11व्या ओव्हरमध्ये हेंड्रिक्स कॅच आऊट झाला. त्याने 26 बॉल्समध्ये 28 रन्सची इनिंग खेळली. त्यानंतर डिकॉक आणि बावुमा यांनी मिळून टीमला विजय मिळवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी