पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खेळविण्यात येणाऱ्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ८५.१ षटकात ३ बाद २७३ धावा बनविल्या आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरूवात चांगली राहिली नाही. रोहित शर्मा केवळ १४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मयांक अग्रवाल याने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर त्याला चेतेश्वर पुजारा याने ५८ धावांची चांगली साथ दिली. त्यामुळे भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली १०५ चेंडू खेळून नाबाद ६३ आणि अजिंक्य रहाणे ७० चेंडूचा सामना करून १८ धावांवर नाबाद खेळत आहे. खराब सूर्य प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेपेक्षा लवकर संपविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. कगिसो रबाडा याने पहिल्या दिवसात पडलेले तीनही विकेट आपल्या नावावर केले.
सलामीवीर मयांक अग्रवाल सध्या चांगल्या फॉर्मात खेळत आहे. पहिल्या टेस्टमध्ये द्विशतक झळकावलेल्या मयांकने पुन्हा एकदा शतकीय खेळी केली आहे. मयांकने चहापानानंतर १८३ चेंडूत आपल्या करिअरचे दुसरे शतक पूर्ण केले. पण शतक झाल्यावर तो जास्त काळ टिकला नाही. त्याने १९५ चेंडून १०८ धावा काढत कगिसो रबाडाचा तिसरा बळी ठरला. त्याने आपल्या खेळीत १६ चौकार आणि २ षटकार लगावले. मयांक सुरूवातीपासूनच खूप सहज दिसत होता. रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी त्याने २५ धावांची भागिदारी केली. तर दुसऱ्या विकेटसाठी त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने १३८ धावा जोडल्या.
त्यानंतर मयांकने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागिदारी केली. ही पार्टनरशीप खुलत असताना मयांकने आपली विकेट टाकली. त्याला रबाडाने ६१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्णधार फाफ डुप्लेसिसकरवी झेलबाद केले. त्याची विकेट १९८ च्या धावसंख्येवर पडली. मयांकने मागील टेस्टमध्ये पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात तो केवळ ७ धावांवर बाद झाला होता.
चेतेश्वर पुजाराने आपल्या शानदार फॉर्म कायम राखत १०७ चेंडूत आपल्या करिअरचे २२ वे अर्धशतक झळकावले. मयांक आणि पुजारा यांनी १९८ चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागिदारी केली. दोघांमध्ये १३८ धावांची भागिदारी झाली. पण पुजारा रबाडाच्या चेंडूवर स्लिपमध्ये ड्युप्लेसीसकरवी झेलबाद झाला त्याने आपल्या ५८ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला.
रोहित शर्मा ३५ चेंडूत १४ धावा काढून स्वस्तात माघारी परतला. त्याला कगिसो रबाडाने १० षटकात विकेट कीपर क्विंटन डी कॉक करवी झेलबाद केले. विशाखापट्टणम येथील सामन्या रोहितने दोन्ही डावात शतकीय खेळी केली होती.
भारतीय संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्निन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव
दक्षिण अफ्रीका: एडेन मार्करम, डीन एल्गर, डी ब्रुयन, टेम्बा बमुवा, फॉफ डुप्लेसी, क्विंटन डिकॉक, मुथुस्वामी, वर्नान फिलेंडर, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे