विराटची तुफान खेळी, आफ्रिकेवर टीम इंडियाचा ७ गडी राखून विजय 

IndvsSA: भारतीय संघाने मोहालीच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी आणि सहा चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. 

virat kohli_AP
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय 
  • तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताची आफ्रिकेवर १-० आघाडी
  • कर्णधार विराट कोहलीची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

मोहाली: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामनाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली. कारण की, कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावरच टीम इंडियाने हा सामना सहा चेंडू आणि ७ गडी राखून जिंकला. यावेळी विराटने अवघ्या ५२ चेंडूत ७२ धावांची तुफानी फलंदाजी केली. यावेळी विराटने ४ चौकार आणि २ षटकारही ठोकले. मोहालीमध्ये खेळविण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकात ५ गडी गमावून फक्त १४९ धावाच केल्या. तर भारताने आफ्रिकेचं हे आव्हान १९ षटकातच पूर्ण केलं. 

या विजयामुळे आता भारताने आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळून महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी बंगळुरुमध्ये खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, पहिला टी-२० सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 

भारतीय संघाने १५० धावांचा पाठलाग करताना धडाकेबाज सुरुवात केली होती. यावेळी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ३३ धावांची झटपट भागीदारी केली. पण रोहित शर्मा १२ धावांवरच बाद झाला. त्यांनतर मैदानात आलेल्या कर्णधार कोहलीने शिखर धवनच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी घातक वाटत असतानाच शिखर धवन बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ४० धावा फटकावल्या. तबरेज शम्सीच्या एका चेंडूवर डेव्हिड मिलरने अतिशय अप्रतिमरित्या झेल घेत शिखर धवनला माघारी धाडलं. दरम्यान, यानंतर आलेल्या रिषभ पंतला फारशी चमक दाखवता आली नाही. तो फक्त ४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने अजिबात पडझड होऊ न देता टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

दरम्यान, विराट कोहलीने या सामन्यातील १७ षटकात अर्धशतक झळकावलं. हे त्याचं आंतरराष्ट्रीय टी-२० मधील २२वं अर्धशतक आहे. 

याआधी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या डिकॉकने अर्धशतक झळकावलं तर बवुमा हा ४९ धावांवर बाद झाला. या दोन फलंदाजच्या जोरावरच आफ्रिकेने १४९ धावांपर्यंत मजल मारली. इतर कोणत्याही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. दरम्यान, भारताच्या सगळ्याच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. यावेळी दीपक चहरने दोन बळी घेतले तर रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि सैनी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी