दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश, कसोटी मालिकेत भारत ३-० ने विजयी 

Ind Won: भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीनही कसोटी सामने जिंकून यजमानांना मोठा धक्का दिला आहे. कसोटी मालिकेत आफ्रिकेवर भारताने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय आहे.

india won against south africa by 1 innings and 202 runs in ranchi test
रांची कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • रांची कसोटीत भारताचा आफ्रिकेवर १ डाव आणि २०२ धावांनी विजय 
  • द. आफ्रिकेला व्हाईटवॉश, भारताचा दणदणीत मालिका विजय 
  • द. आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर दुसरा डाव १३२ धावांवर आटोपला 

रांची: India vs South Africa, Ranchi Test, Day-4: टीम इंडियाने तुफानी कामगिरी करत रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि २०२ धावांनी प्रचंड विजय मिळवला आहे. भारताने ३-० अशी मालिका जिंकत आफ्रिकेला ऐतिहासिक क्लिन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने रांचीमधील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. भारताचा आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशीपमध्ये हा सलग पाचवा विजय आहे. या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने ४९७/९ या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव हा १६२ धावांवरच आटोपला होता. 

आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपल्यामुळे भारताला तब्बल ३३५ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताने आफ्रिकेला फॉलो-ऑन देण्याचा निर्णय घेतला. तसंच यावेळी कर्णधार विराटने आणखी एक रेकॉर्ड देखील स्वत:च्या नावे केला आहे. विरोधी संघाला सर्वाधिक वेळा (८ वेळा) फॉलोऑन देणारा तो भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचा (७ वेळा) विक्रम मोडला आहे. दरम्यान, भारताने दिलेला फॉलोऑनचा पाठलाग करताना आफ्रिकेचा दुसरा डाव हा १३३ धावांवरच आटोपला. 

या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा (२१२ धावा), अजिंक्य रहाणे (११५ धावा) आणि रवींद्र जडेजा (५१ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच डावात ४९७ धावांचा डोंगर रचला होता. दरम्यान उमेश यादवने पहिल्या डावात आफ्रिकेचे झटपट ३ बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला. यावेळी मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले. 

दरम्यान, दुसऱ्या डावात देखील भारतीय गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळाला. कारण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १३३ धावांमध्येच आटोपण्यात आला. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने तीन बळी घेतले तर  उमेश यादव आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले तर अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवले. या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर या संपूर्ण मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रोहितलाच मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.  

या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. कारण की, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेला एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे भारताने आफ्रिकेविरुद्ध ३-० असा जबरदस्त विजय मिळवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी