IND vs WI 1st ODI : धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार

IND vs WI 1st ODI : शिखर धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार ही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे मॅचची दोन प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील.

India won by 3 runs against West Indies in first ODI
धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IND vs WI 1st ODI : धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार
  • मॅच भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकली, भारताचा तीन धावांनी विजय
  • ९७ धावा करून बाद झालेला शिखर धवन मॅन ऑफ द मॅच

IND vs WI 1st ODI : शिखर धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार ही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे मॅचची दोन प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे मॅच झाली. ही मॅच भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकली. भारताचा तीन धावांनी विजय झाला.

पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून वेस्ट इंडिजने बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंगला आलेल्या भारताने ५० ओव्हरमध्ये ७ बाद ३०८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३०५ धावा एवढी मजल मारता आली. या मॅचमध्ये शिखर धवनने सर्वाधिक ९७ धावा केल्या. तोच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला.

भारताकडून कॅप्टन असलेल्या शिखर धवनने ९७, शुभमन गिलने (धावचीत) ६४, श्रेयस अय्यरने ५४, सुर्यकुमार यादवने १३,  विकेटकपीर असलेल्या संजू सॅमसनने १२, दीपक हूडाने २७, अक्षर पटेलने २१, शार्दुल ठाकुरने नाबाद ७ आणि मोहम्मद सिराजने नाबाद १ धाव केली. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी २ तर अकील होसेन आणि आर. शेफर्डने प्रत्येकी १ विकेट घेतली. 

वेस्ट इंडिजकडून विकेटकीपर असलेल्या शाई होपने ७, केल मेयर्सने ७५, एस. ब्रुक्सने ४६, ब्रँडन किंगने ५४, कॅप्टन असलेल्या निकोलस पूरनने २५, आर. पॉवेलने ६, अकील होसेनने नाबाद ३२ आणि आर. शेफर्डने नाबाद ३९ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकुर या तिघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

नर्व्हस नाइंटिजचा बळी ठरला शिखर धवन

शिखर धवनने ३६वे अर्धशतक केले पण त्याचे शतक तीन धावांनी हुकले. धवन ९९ बॉल खेळून ९७ धावा करत बाद झाला. त्याने दहा फोर आणि तीन सिक्स मारल्या. पण एका चुकीमुळे शिखर धवनचे शतक हुकले तो नर्व्हस नाइंटिजचा बळी ठरला. 

विंडीज विरुद्ध नर्व्हस नाइंटिजचा बळी ठरलेला शिखर धवन हा दुसरा भारतीय कॅप्टन ठरला. याआधी २००९ मध्ये महेंद्रसिंह धोनी विंडीजविरुद्ध एकदा ९५ धावा करून बाद झाला होता. तेव्हा तो टीमचा कॅप्टन होता. 

धवन हा विंडीज विरुद्ध टी २० आणि वन डेमध्ये नर्व्हस नाइंटिजचा बळी ठरलेला पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. तो विंडीजविरुद्ध टी २० मध्ये एकदा ९२ धावा करून बाद झाला होता आणि शुक्रवारी २२ जुलै २०२२ रोजी झालेल्या वन डेमध्ये तो ९७ धावा करून बाद झाला. 

सचिन तेंडुलकर हा वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ वेळा नर्व्हस नाइंटिजचा बळी ठरलेला भारतीय क्रिकेटपटू आहे. या यादीत सौरव गांगुली आणि शिखर धवन हे दोघे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. माजी कॅप्टन विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी