भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, सामना आणि मालिकाही खिशात

India Won: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवत मालिका खिशात टाकली. शेवटच्या टी-२० सामन्यात इंडिजवर भारताने ६७ धावांनी मात केली.   

india won by 67 runs west indies lost the t-20 match and series also
भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, सामना आणि मालिकाही खिशात  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
  • तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ने पराभव
  • रोहित, राहुल आणि विराटच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताचा मोठा विजय

मुंबई: भारताने वेस्टइंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने विंडीजवर ६७ धावांनी विजय संपादन केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या तुफानी फटकेबाजीने भारतीय संघाच्या विजयाचा पाय रचला. तर अवघ्या २९ चेंडूत ७० धावा ठोकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने त्यावर कळस रचला. या तीनही फलंदाजांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २४१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, वेस्ट इंडिज २० षटकात ८ गडी गमावून फक्त १७३ धावाच करु शकलं. 

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने फक्त ३ गडी गमावून २० षटकात तब्बल २४० धावा केल्या. यावेळी रोहित शर्माने ३४ चेंडूत ७१ धावा, केएल राहुलने ५६ चेंडूत ९१ धावा तर विराट कोहलीने २९ चेंडूत ७० धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्यामुळे भारतला २४० धावांचा डोंगर रचता आला.

 

दुसरीकडे या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ सुरुवातीलाचा गडबडला. कारण त्यांचे तीन गडी हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर आलेल्या हेटमायर आणि कर्णधार पोलार्ड जबरदस्त फटकेबाजी केली. पण या दोघांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. यावेळी हेटमायरने २४ चेंडूत ४१ धावा केल्या. तर कर्णधार पोलार्डने ३९ चेंडूत ६८ धावा केल्या. यावेळी भारतीय गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार, शमी, कुलदीप यादव आणि दीपक चहरने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

या संपूर्ण सामन्यात तब्बल २८ षटकार पाहायला मिळाले. त्यापैकी भारतीय फलंदाजानी १६ षटकार मारले. त्यात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७ षटकार ठोकले. तर पोलार्डने ६ षटकार मारले. यावेळी विराट कोहली आणि पोलार्ड यांच्यासोबतच रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी देखील उत्तुंग षटकार ठोकत चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी