ICC Under 19 World Cup 2022 | नवी दिल्ली : सध्या वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकात (Under 19 World Cup) भारताने युगांडाविरुद्ध (India vs Uganda) ३२६ धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला राज अंगद बावा (Raj Angad Bawa). राजने या सामन्यात १०८ चेंडूत १६२ धावांची नाबाद खेळी करून निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्याने १४ चौकार आणि ८ षटकार लगावले होते. याशिवाय १९ वर्षीय राज भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे या युवा फलंदाजाने १८ वर्षांचा जुना शिखर धवनचा विक्रम मोडला. २००४ मध्ये अंडर-१९ विश्वचषकामध्ये धवनने स्कॉटलंडविरुद्ध १५५ धावांची खेळी खेळली होती. लक्षणीय बाब म्हणजे राज बावा आणि त्याच्या कुटुंबाचे खेळासोबतचे जुने नाते आहे. वडील क्रिकेटचे प्रशिक्षक आहेत. तर आजोबा तरलोचन सिंग बावा ऑलिम्पियन होते आणि तो परिवाराचा हा वारसा पुढे चालवत आहे.
राज अंगद बावाने युगांडाविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या संवादात त्याचे क्रिकेटपटू बनणे, कौटुंबिक वारसा पुढे नेणे आणि इतर अनेक समस्यांबद्दल सांगितले आहे. राज ५ वर्षांचा असताना त्याचे आजोबा तरलोचनसिंग बावा यांचे निधन झाले. १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते.
१९ वर्षीय राज म्हणाला, माझ्या आजोबांच्या फारशा आठवणी नाहीत. कारण ते या जगातून गेले तेव्हा मी खूप लहान होतो. पण मी माझी आज्जी आणि वडीलांकडून त्यांच्याबाबत कथा ऐकल्या आहेत, त्या नेहमी माझ्यासोबत असतील."
भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग प्रमाणेच राजच्या जर्सीचा क्रमांकही १२ आहे. त्यांने या क्रमांकाची जर्सी का घातली? यामागील कारण खूप खास आहे, ज्याचा खुलासा त्यांने केला. राज म्हणाला, “मी विविध कारणांसाठी १२ वा क्रमांक निवडला. माझ्या दिवंगत आजोबांचा १२ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. माझा आदर्श युवराज सिंगही १२ नंबरची जर्सी घालायचा. १२ डिसेंबर रोजी त्यांचाही वाढदिवस असतो. मी देखील माझा जन्मदिवस १२ नोव्हेंबरला साजरा करतो.”
जेव्हा राज मोठा होत होता तेव्हा त्याची आवड नृत्य आणि नाटक ही होती. वडील सुखविंदर सिंग यांनाही वाटत होते की, आपला मुलगा क्रिकेटरऐवजी अभिनेता होईल. पण नंतर असे काही घडले की ज्यामुळे राज क्रिकेटकडे वळला. वडील सुखविंदर यांनी त्यासंबंधीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “राज सुरूवातीला क्रिकेट खेळत नव्हता. मीही क्रिकेटबद्दलची आशा सोडली होती. मला वाटले होते की तो अभिनेता होईल.
राजचे क्रिकेटवरील प्रेम तेव्हापासून सुरू झाले जेव्हा तो पहिल्यांदा वडिलांसोबत धर्मशाळा स्टेडियममध्ये गेला होता. येथूनच त्याचे क्रिकेटपटू बनण्यास सुरुवात झाली. त्यांनी सांगितले की, “मी प्रशिक्षक होतो आणि आम्ही काही स्थानिक स्पर्धा खेळण्यासाठी धर्मशाळाला गेलो होतो. संघाच्या सराव सत्रानंतर राज माझ्याकडे आला आणि म्हणाला, पप्पा मलाही क्रिकेटर व्हायचे आहे. तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता."
राजचे वडील सुखविंदर सिंग हरियाणा ज्युनियर संघासाठी हॉकी खेळले आणि १९८८ मध्ये भारताच्या अंडर-१९ कॅम्पसाठी त्यांची निवड झाली. पण स्लिप डिस्कमुळे त्याचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते प्रशिक्षक झाले. ५४ वर्षीय सुखविंदर यांनी आपला मुलगा वेगवान गोलंदाज होण्याचा किस्सा सांगितला.
ते म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा राजचा वेग पाहिला तेव्हा गुरुग्रामच्या ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये मी होतो. तो ११ वर्षांचा असावा. लेदर बॉलने राजने सामन्यामध्ये आधीच ५ बळी घेतल्याने मी प्रभावित झालो. त्यानंतर मी त्याच्या गोलंदाजीवर काम केले आणि १ वर्ष फॉलो थ्रू केले. त्यानंतर मी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि त्यामुळे तो ऑलराउंडर खेळाडू बनला.
तर, खुद्द राजही तो ऑलराउंडर बनण्याचे श्रेय त्याच्या वडिलांना देतो. तो म्हणाला, “वडिलांना माझ्या खेळाची संपूर्ण माहिती होती. मी पहिल्यापासूनच वेगवान गोलंदाज होतो. त्यामुळे त्यांनी मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. सुरुवातीला मी फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच्या ऑफ स्पिनवर लक्ष केंद्रित केले. पण विजय मर्चंट ट्रॉफीसाठी पंजाब संघाचा कॅम्प होता आणि या कॅम्पमधून मी पुन्हा वेगवान गोलंदाजीला सुरुवात केली. पण मी हे वडीलांना सांगितले नाही. मात्र नंतर पकडलो गेलो. पण वडील खुश होते आणि आज त्यांच्यामुळेच मी ऑलराउंडर खेळाडू झालो आहे.