Indian Women Cricket: मिताली राजसोबत झालेल्या वादानंतर हरमनप्रीत कौर पाहा काय करणार होती...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 25, 2019 | 19:55 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Indian Women Cricket: टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीममध्ये झालेल्या वादानंतर क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा भारताच्या महिला टी-२० टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने केला आहे.

harmanpreet kaur
हरमनप्रीत कौर घेणार होती क्रिकेटमधून ब्रेक   |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली : भारताच्या महिला टी-२० टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीममध्ये झालेल्या वादानंतर क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने टीममधील सीनिअर खेळाडू मिताली राजलाच संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून क्रिकेट विश्वात खूप मोठं वादळ निर्माण झालं होते. या वादाचे परिणाम इतके वाईट झाले की, शेवटी टीम कोच रमेश पोवारलाही डच्चू देण्यात आला. त्यावर आता हरमनप्रीतने खुलासा केला असून, त्यावेळी क्रिकेटलाच मोठा ब्रेक देण्याचा विचार जवळपास निश्चित केला होता, असं तिनं म्हटलंय.

'सत्य वेगळं आणि चर्चा वेगळीच'

हरमनप्रीतने टी-२० वर्ल्ड कपनंतर बिग बॅश लीगमध्येही आपलं नशीब आजमावलं होतं. पण, भारताच्या टीममध्ये झालेले वाद त्यानंतर वन-डेची कॅप्टन मिताली राजबरोबरोर तिचा झालेला वाद यांमुळे वातावरण खूपच खराब झाले होते. त्यामुळे तिला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या सगळ्याला हरमनप्रीत वैतागली होती. या सगळ्यावर हरमनप्रीतने ईएसपीएन क्रिकइन्फोला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्यात हरमनप्रीत म्हणाली की, 'जखमी झाल्यामुळे मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ड्रेसिंग रूममधून ब्रेक देण्यात आला होता. पण, मी माझ्या मनाची तयारी केली होती. माझ्या आई-वडिलांना क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा विचार असल्याचे सांगणार होते. मी केवळ सीनिअर खेळाडू आहे म्हणून टीममध्ये स्थान मिळवण्याची माझी तयारी नव्हती. मला क्रिकेटपासून लांब जायचं होतं. टीमच्या बाबतीत खूपच वाईट घडलं. काही गोष्टींची अशी चर्चा झाली की त्याचा सत्याशी काडीमात्र संबंध नव्हता. त्यामुळेच मला हे सगळं सोडून जावसं वाटत होतं. मी फक्त इथं क्रिकेट खेळायला आले आहे.'

ज्यावेळी हरमनप्रीत आणि मिताली राज हा वाद उफाळून आला. त्यानंतर महिला टीमचे कोच रमेश पोवार यांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर नवीन कोच डब्ल्यू व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर निघाली होती. पण, हरमनप्रीत जायबंदी होती. त्यामुळं तिला आवश्यक असणारा ब्रेक तिला देण्यात आला होता. त्याकाळात हरमनप्रीत क्रिकेट सोडण्याचा विचार करत होती. तिचा हा खुलासा महिला क्रिकेटप्रेमी आणि तिच्या चाहत्यांसाठी खूप धक्कादायक मानला जात आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी