ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ब्रिस्बेन कसोटीचा शेवटचा दिवस मंगळवारी आहे. भारताने दुसऱ्या डावात बिनबाद चार धावा केल्या आहेत. ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यासाठी मंगळवारी भारताला आणखी ३२४ धावा करायच्या आहेत. ही किमया साधल्यास भारत ब्रिस्बेन कसोटीसह 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' २-१ अशी जिंकेल. याउलट ऑस्ट्रेलियाने भारताच्या सर्व फलंदाजांना लवकर बाद केले तर ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन कसोटीसह 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' २-१ अशी जिंकेल. दोन्ही संघांकडे संधी आहे. सामन्याच्या निर्णायक दिवशी काय घडणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ करणारी एक घटना घडली आहे. (Injury concern for Mitchell Starc ahead of Final Day of Brisbane Test IND vs AUS)
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला सामन्याच्या चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. गुडघ्याच्या मागे असलेली नस दुखावल्यामुळे त्याच्या पायाच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. फिजिओ त्याची दुखापत लवकर बरी व्हावी यासाठी उपचार करत आहेत. स्टार्क दुखापतीतून सावरला आणि पाचव्या दिवशी गोलंदाजी करू शकला तर ऑस्ट्रेलियाची चिंता दूर होईल. पण दुखापतीमुळे स्टार्क गोलंदाजी करू शकला नाही तर निर्णयाक दिवशी एका प्रमुख गोलंदाजाची कमतरता ऑस्ट्रेलियाला जाणवणार आहे.
ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा १९८८मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पराभव झाला. विंडीजने ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत ब्रिस्बेनमध्ये ३१ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. यातील २४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आणि ७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. यामुळे १९८८च्या पराभवानंतर आतापर्यंत ब्रिस्बेनमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी ऑस्ट्रेलिया अपराजीत आहे. ही ऐतिहासिक परंपरा मोडीत काढून विजय मिळवण्याची संधी भारताकडे आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये ६३वा कसोटी सामना खेळत आहे. याआधीच्या ६२ पैकी ४० कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. तब्बल १३ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत आणि आठ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सातवा कसोटी सामना सुरू आहे. याआधीच्या सहा कसोटी सामन्यांपैकी पाच सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. यामुळे यावेळी ब्रिस्बेनमध्ये काय होते याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटी आठ गडी राखून तर भारताने मेलबर्न कसोटी आठ गडी राखून जिंकली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. यामुळे ब्रिस्बेन कसोटीचे महत्त्व वाढले आहे. ही कसोटी जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील स्वतःची स्थिती मजबूत करणे शक्य होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीत मोजले जात आहे. या टक्केवारीला महत्त्व आहे. कसोटी सामने जिंकण्याचे प्रमाण ७३.८ टक्के असल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. जिंकण्याचे प्रमाण ७०.२ टक्के असल्यामुळे भारत या तक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे तर जिंकण्याचे प्रमाण ७० टक्के असल्यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन कसोटी जिंकल्यास भारत 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' जिंकेल तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यातील भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.