नवी दिल्लीः यंदाच्या आयपीएल लिलावात गोलंदाजांचा बोलबाला अधिक होता. जे ऑलराऊंडर्स गोलंदाजीत चांगले आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आले. यात न्यूझीलंडच्या २६ वर्षीय गोलंदाज काइल जेमिसनचे नाव समोर येताच संघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. या वातावरणात या खेळाडूने विक्रमी रक्कम आपल्या नावावर केली.
काइल जेमिसनचे बेस प्राईज ७५ लाख रुपये होते. त्याचं नाव समोर येताच पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. या दोन्ही संघांमधे ७.७५ कोटी रुपयांपर्यंत चूरस झाली. परंतु, नंतर दिल्ली कॅपिटल्सने माघार घेतली आणि पंजाब किंग्स मैदानात उतरली. या दोन्ही संघांमध्ये जोरदार चूरस झाली. परंतु, शेवटी विराट कोहलीच्या बंगळुरूने जेमिसनला १५ कोटी रूपयांत खरेदी केले.
दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस हा दिवसातील सर्वात महागडा खेळाडू बनला होता. त्याला राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाखात खरेदी केले होते. यासोबतच तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. त्याने युवराज सिंह (१६ कोटी) चा विक्रम मोडला. मॉरिसनंतर यावेळेच्या लिलावात काइल जेमिसन हाच सर्वात महागडा खेळाडू ठरला.
मागील वर्षाच्या फेब्रुवारीत काइल जेमिसनने भारताविरूद्ध आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन केले होते. जेमिसनने आपल्या पहिल्याच वन-डे सामन्यात भारताविरूद्ध आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने धमाल करत थेट मॅन ऑफ द मॅचचा सन्मान जिंकला होता. असे करणारा तो दुसरा क्रिकेटर बनला होता.
काइल जेमिसन न्यूझीलँडच्या अंतर्गत सामन्यांमध्ये ऑकलँडसाठी खेळतो. त्याने २०१४ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत युवा किवी संघाविरुद्ध आपली पहिली झलक दाखवली होती. यानंतर २०१९ मध्ये सुपर स्मॅश टी-२० लीगमध्ये त्याने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती. कँटरबरी किंग्स आणि ऑकलँड एसेस दरम्यान झालेल्या सामन्यात त्यांनी ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते. हा न्यूझीलँड टी-२० च्या इतिहासातील विक्रम आहे. आयपीएलच्या मागील हंगामात तो १० सामन्यांत २२ बळी घेऊन सर्वोच्च स्थानावर होता.