इशांत शर्मा अहमदाबादमध्ये खेळणार १००वी कसोटी

भारताचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा अहमदाबादमध्ये कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. ही कामगिरी करणारा तो कपिल देव नंतरचा दुसरा जलदगती भारतीय गोलंदाज आहे.

Ishant Sharma playing 100th test match in Ahmedabad
इशांत शर्मा अहमदाबादमध्ये खेळणार १००वी कसोटी 

थोडं पण कामाचं

  • इशांत शर्मा अहमदाबादमध्ये खेळणार १००वी कसोटी
  • मे २००७ मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
  • कसोटी क्रिकेटमध्ये ९९ सामन्यांत १७९ डावांत ३०२ बळी

अहमदाबाद: भारताचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा अहमदाबादमध्ये कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणार आहे. ही कामगिरी करणारा तो कपिल देव नंतरचा दुसरा जलदगती भारतीय गोलंदाज आहे. याआधी २०१९ मध्ये इशांत शर्माने एकदा नैराश्यातून स्वतःचे वर्णन 'विझलेला निखारा' असे केले होते. पण आता निखारा प्रज्वलित झाल्याचे चित्र आहे. (Ishant Sharma playing 100th test match in Ahmedabad)

इशांत शर्मा हा ६ फूट ५ इंच उंचीचा ताडमाड गोलंदाज आहे. त्याने मे २००७ मध्ये बांगलादेश विरुद्ध शेरे बांगला नॅशनल स्टेडियम येथे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून टप्प्याटप्प्याने छान कामगिरी करत इशांत शर्मा भारताचा प्रमुख गोलंदाज झाला. काही वेळा दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले. पण संघात असताना कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्याचे काम तो सातत्याने करत आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये ९९ सामन्यांत १७९ डावांत गोलंदाजी करणाऱ्या इशांत शर्माने १८ हजार ४२० चेंडू टाकले. त्याने ९ हजार ७३१ धावा देत ३०२ बळी घेतले. एका डावात ७४ धावा देत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. तसेच एका कसोटी सामन्यात १०८ धावा देत १० बळी ही त्याची कौतुकास्पद कामगिरी. इशांत शर्माने एका कसोटी सामन्यात दहा बळी घेतले तर ११ कसोटी सामन्यांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला.

फक्त कसोटी क्रिकेटच नाही तर अन्य प्रकारांमध्ये इशांत शर्मा चमकला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ८० एकदिवसीय सामने खेळून ११५ बळी मिळवले आहेत. तसेच १४ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये खेळलेल्या इशांत शर्माने ८ बळी मिळवले आहेत. या व्यतिरिक्त इशांत शर्माने आयपीएलमध्ये ९० सामने खेळून ७१ बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात त्याने १२ धावा देत पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. 

गोलंदाज इशांत शर्मा फलंदाजीत मर्यादीत प्रमाणात चमकला आहे. इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ९९ सामन्यांतील १३३ डावांत फलंदाजी केली. तब्बल ४४ वेळा नाबाद राहिलेल्या इशांत शर्माने ७३६ धावा केल्या. यात ५७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकही षटकार मारलेला नाही, पण ८४ चौकार मारले आहेत. 

प्रतिस्पर्धी संघ वेगाने धावा काढत असतो, अशा वेळी त्यांच्या फलंदाजांना थोपवणे, धावांची गती कमी करणे आणि बळी मिळवणे हे काम करणारा इशांत शर्मा हा एक प्रभावी गोलंदाज आहे. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना इशांत शर्माला अनेकदा कठीण प्रसंगी गोलंदाजी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इशांत शर्माची कामगिरीच त्याचे कसोटी क्रिकेटमधील महत्त्व स्पष्ट करते.

सध्या भारतीय क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेला जास्त महत्त्व देत आहे. आर्थिक कारणांमुळे हे अवास्तव महत्त्व दिले जात आहे. पण यामुळे क्रिकेटपटूंची कारकिर्द मर्यादीत काळाची होत आहे, असे मत इशांत शर्माचे माजी सहकारी आणि क्रिकेट प्रशिक्षक विजय दहिया यांनी व्यक्त केले. इशांत शर्मा सारखी कसोटी क्रिकेटमधील प्रदीर्घ कारकिर्द भविष्यात अन्य कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला जमेल असे वाटत नाही, अशी चिंता विजय दहिया यांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी