ऑलिंपिकविषयी जपानच्या मंत्र्याने केले सूचक वक्तव्य

ऑलिंपिकविषयी जपानच्या मंत्र्याने सूचक वक्तव्य केले. काहीही होऊ शकते असे जपानचे कॅबिनेट मंत्री टारो कोनो म्हणाले.

Japan Minister Says
ऑलिंपिकविषयी जपानच्या मंत्र्याने केले सूचक वक्तव्य 

थोडं पण कामाचं

  • ऑलिंपिकविषयी जपानच्या मंत्र्याने केले सूचक वक्तव्य
  • टोकियोत २०२१ मध्ये ऑलिंपिक होणार आहे
  • टोकियोसह संपूर्ण जपानवर कोरोनाचे संकट असल्यामुळे ऑलिंपिकबाबत अनिश्चितता

टोकियो: ऑलिंपिकविषयी जपानच्या मंत्र्याने सूचक वक्तव्य केले. काहीही होऊ शकते असे जपानचे कॅबिनेट मंत्री टारो कोनो म्हणाले. (Japan Minister Says "Anything Can Happen" With Tokyo Olympics)

जपानची राजधानी टोकियो येथे २०२० मध्ये उन्हाळी ऑलिंपिक होणार होते. पण कोरोना संकटामुळे ऑलिपिंकचे आयोजन २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. टोकियो येथे ऑलिंपिक २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तसेच दिव्यांगासाठीचे ऑलिंपिक २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे जपानमध्ये टोकियोसह अनेक भागांमध्ये ७ फेब्रुवारी पर्यंत वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या उपायांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर टोकियो येथे होणार असलेले उन्हाळी ऑलिंपिक आणि दिव्यांगासाठीचे ऑलिंपिक पुन्हा पुढे ढकलले जाईल अथवा रद्द केले जाईल. 

आधी जपान सरकार आणि आयोजन समिती ठरल्याप्रमाणे २०२१ मध्ये ऑलिपिंक होणार असे वारंवार सांगत होते. पण पहिल्यांदाच जपानच्या एका कॅबिनेट मंत्र्याने ऑलिंपिकच्या आयोजनाविषयी शंका निर्माण व्हावी अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. काहीही होऊ शकते असे जपानचे कॅबिनेट मंत्री टारो कोनो (Japan Cabinet Minister Taro Kono) म्हणाले. कोरोना संकटाचा आढावा घेऊन लवकरच उन्हाळी ऑलिंपिक आणि दिव्यांगासाठीचे ऑलिंपिक पुन्हा पुढे ढकलायचे की रद्द करायचे याचा निर्णय घेण्याचे संकेत जपानकडून देण्यास सुरुवात झाली आहे.

जपानमध्ये अलिकडेच एक सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ८० टक्के नागरिकांनी कोरोना संकटाचे भान ठेवून ठेवून ऑलिंपिकचे आयोजन रद्द करावे, असे मत व्यक्त केले. ऑलिंपिक झाले तर कोरोना पसरण्याचा धोका वाढेल, खेळाडूंचे आरोग्य धोक्यात येईल; अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली. 

ऑलिंपिक ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन करायचे तर कोणतीही हयगय होऊन चालणार नाही. स्पर्धा व्यवस्थित पार पडल्यास यजमान देशाची प्रतिमा उंचावते, त्यांच्याकडे पर्यटन, क्रीडा तसेच अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाला चालना मिळते. रोजगार निर्मिती होते. पण गडबड झाली तर प्रतिमा मलीन होते आणि त्याचा देशाच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका असतो. सध्या कोरोना संकट सुरू आहे. या बिकट परिस्थितीत ऑलिंपिकचे आयोजन करणे ही गंभीर चूक ठरण्याची भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहे. या वास्तवाचे भान ठेवून ऑलिंपिक संदर्भात योग्य वेळी योग्य तो निर्णय जाहीर करणार असल्याचे सुतोवाच आयोजन समितीने केले आहे. यानंतर ऑलिंपिकविषयी जपानचे कॅबिनेट मंत्री टारो कोनो यांनी सूचक वक्तव्य केले.

काहीही होऊ शकते. परिस्थिती कोणतेही टोक गाठू शकते, असे टारो कोनो म्हणाले. जपानची लोकसंख्या १२ कोटी ६४ लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये आतापर्यंत ३ लाख ९ हजार २१४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ४ हजार ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना झालेल्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६७ जण बरे झाले आहेत. अद्याप जपानमध्ये ६६ हजार ४३२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जपानमध्ये २३ जुलैपासून सुरू होणार असलेल्या उन्हाळी ऑलिंपिकला ६ महिन्यांपेक्षा थोडा जास्त कालावधी शिल्लक आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, अनेक देशांचे संघ ही बाब विचारात घेतली तर ऑलिंपिक संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय जाहीर करावा लागणार आहे. स्पर्धा होणार की नाही याबाबत सध्या अनिश्चितता आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Japan Prime Minister Yoshihide Suga) यांनी ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा संकल्प केल्याचे जाहीर केले होते. मात्र जपानचे कॅबिनेट मंत्री टारो कोनो यांच्या ताज्या वक्तव्यामुळे ऑलिंपिक संदर्भात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

सध्या परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला जपानमध्ये १४ दिवसांच्या क्वारंटाइनचे बंधन आहे. यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे कठीण झाले आहे. ऑलिंपिकच्या निमित्ताने अवघ्या काही दिवसांत लाखोंच्या संख्येने नागरिक यजमान देशात दाखल होतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. यातून संपूर्ण जपानमध्ये कोरोनाचा प्रार्दूभाव होण्याचा मोठा धोका आहे. जपानचे सरासरी वय ४८ वर्षे ४ महिने एवढे आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. याच कारणामुळे कोरोना संकटाची गंभीरपणे दखल घेऊन जपान ऑलिंपक संदर्भात निर्णय घेणार आहे.

जाहीर झालेल्या नियोजनानुसार जपान नंतर २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत फ्रान्सची (France) राजधानी पॅरिस (Paris) येथे उन्हाळी ऑलिंपिक होणार आहे. तसेच २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पॅरिसमध्ये दिव्यांगासाठीचे ऑलिंपिक होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी