IND vs NZ, WC 2019: कांगारूंविरूद्ध 'कुलचा'चं निघाले तेल, आता न्यूझीलंडच्या फलंदाजांचा करणार खेळ... 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

लागोपाठ दोन सामने जिंकल्यावर टीम इंडिया आता गुरूवारी न्यूझीलंड विरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात कुलचा जोडी कर्णधार विराटसाठी एक ब्रम्हास्त्र सिद्ध होणार आहे. 

Virat kohli, Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal,
विराट कोहली, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव  

लंडन :  भारतीय क्रिकेट संघाची यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला ३६ धावांच्या अंतरांनी मात दिली. आता विराट सेना तिसऱ्या सामन्यासाठी गत उपविजेत्याशी भिडणार आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्तवाखाळी गेल्या चार वर्षात कीवी क्रिकेट टीमने चांगली कामगिरी केली आहे. यावेळीही वर्ल्ड कपच्या पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवत स्पर्धेला चांगली सुरूवात केली आहे. 

अशात विराट कोहलीसाठी न्यूझीलंडविरूद्ध दोन खेळाडू तुरूपचे एक्के सिद्ध होणार आहे. हे दोन खेळाडू आहेत. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल...  या दोघांच्या जोडीला 'कुलचा' म्हटले जाते. ही जोडी जरा कांगारूंविरूद्ध खेळताना डगमली होती. त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त धावा दिल्या होत्या आणि दोनच विकेट मिळविल्या होत्या.  कुलदीपने ९ षटकात ५५ धावा देऊन एकही विकेट घेतली नाही, तर युजवेंद्र चहल याने १० षटकात ६२ धावा देऊन २ विकेट घेतल्या होत्या. अशात दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरूद्ध चांगली कामगिरी करून पुन्हा लय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील. दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या ९ पैकी ५ विकेट या जोडीने आपल्या नावे केल्या होत्या. कुलदीपने १० षटकात ४६ धावा देऊन १ विकेट घेतली होती. तर चहलने १० षटकात ५१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. या दोघांकडून अशा प्रकारच्या कामगिरीची विराट कोहलीला आगामी सामन्यात अपेक्षा आहे. 

किवींविरूद्ध शानदार आहे 'कुलचा' जोडीचा रेकॉर्ड 

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी न्यूझीलंडविरूद्ध नेहमी चांगली कामगिरी केली आहे. कुलदीपने किवींविरूद्ध आतापर्यंत केवळ ५ सामने खेळले आहेत. या पाच डावात २१ च्या सरासरीने आणि ४.८४ च्या स्ट्राइक रेटने एकूण ९ विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरूद्ध त्याची सर्वात चांगली कामगिरी ३९ धावा देऊन ४ विकेट पटकावल्या होत्या. कुलदीपने पाच सामन्यात दोन वेळा चार-चार विकेट घेतल्या आहेत. तर एका सामन्यात त्याने एक विकेट घेतली आहे. तर दोन सामन्यात एकही विकेट घेतली नाही. 

तर युजवेंद्र चहलचा न्यूझीलंड विरूद्धचा रेकॉर्डही चांगला आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंड विरूद्ध ८ सामने खेळले आहे. या आठ डावात त्याने २१.१५ सरासरीने आणि ५.११ च्या इकॉनॉमिने १३ विकेट घेतल्या आहेत. त्याची किवींविरूद्ध सर्वात चांगली कामगिरी ४१ धावा देऊन ३ विकेट आहे. चहलचा किव टीम विरूद्धची सरासरी आणि इकॉनामी ही करिअरपेक्षा अधिक आहे. 

दोन्ही खेळाडूंनी एकूण १३ सामन्यात २२ विकेट मिळविल्या आहेत. दोघांच्या जोडीने न्यूझीलंडविरूद्ध एकूण ५ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याच्या खात्यात १५ विकेट आल्या होत्या. त्यामुळे भारताला न्यूझीलंड विरूद्ध विजय मिळवायचा असेल तर कुलचा जोडी चालणे खूप गरजेचे आहे... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी