लसिथ मलिंगाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

श्रीलंका संघाचाच नाही तर संपूर्ण जगातील टी-२० क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज, यॉर्करकिंग असणाऱ्या लसिथ मलिंगाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे.

Lasith Malinga retires from international cricket
लसिथ मलिंगाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • श्रीलंका संघाचाच नाही तर संपूर्ण जगातील टी-२० क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज, यॉर्करकिंग असणाऱ्या लसिथ मलिंगाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे.
  • मलिंगाला आगामी टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा होती.
  • मलिंगाला जागा न मिळाल्याने त्याने अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्ती घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

कोलंबो : श्रीलंका संघाचाच नाही तर संपूर्ण जगातील टी-२० क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज, यॉर्करकिंग असणाऱ्या लसिथ मलिंगाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. मलिंगाला आगामी टी-२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा होती. पण काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केली, पण त्यात मलिंगाला जागा न मिळाल्याने त्याने अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्ती घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. (Lasith Malinga retires from international cricket)

तब्बल १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला मलिंगाने अलविदा म्हटलं आहे. तब्बल ३४० सामन्यांत ३० टेस्ट, २२६ वनडे आणि ८४ टी-२० सामने मलिंगाने खेळले. ज्यामध्ये एकूण ५४६ विकेट्स मिळवत मलिंगा यॉर्कर किंग म्हणून जगभरात प्रसिद्ध होता. यावेळी त्याने टेस्टमध्ये १०१, वनडेमध्ये ३३८ आणि टी-२० मध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत. ३८ वर्षीय मलिंगा मार्च २०२० मध्ये अखेरचा सामना खेळला होता.

लसिथने ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, मी माझे टी-२० चे शूज आता कायमसाछी टांगून ठेवत आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मी निवृत्ती घेत आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला साथ दिलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. मी येणाऱ्या काळात युवा क्रिकेटपटूंसोबत माझे अनुभव शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.

लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ साली पाऊल ठेवलं. त्याने कसोटी क्रिकेटमधून खेळण्यास सुरुवात केली. जुलै २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याने संघात पदार्पण केलं. यावेळी तो खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये तो खास छाप न सोडताच ३० कसोटी सामन्यानंतर पुन्हा कसोटी सामना खेळलाच नाही. २०१० मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण वनडे आणि टी-२० सामन्यात मात्र मलिंगाचा खेळ उत्तम होता. जुलै २००४ मध्ये युएई विरुद्ध पदार्पण करणाऱ्या मलिंगाने आजवर २२६ वनडे सामने खेळले. यात त्याने ३३८ विकेट्स घेतल्या. जुलै २०१९ मध्ये बांग्लादेश विरुद्ध अखेरची वनडे मॅच मलिंगा खेळला होता.

वनडेसह टी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या मलिंगाने जून २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली टी-२० मॅच खेळली. त्याने ८४ सामन्यात १०७ विकेट्स घेतल्या. ज्यानंतर मार्च २०२० मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध तो अखेरची टी२० मॅच खेळला होता. आय़पीएलमध्येही मलिंगाने अद्भुत खेळाने मुंबई इंडियन्स संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी