Lemi Berhanu Hayle Wins Tata Mumbai Marathon 2023, Gopi Thonakal Highest Placed Indian : टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2023 आज (रविवार 15 जानेवारी 2023) झाली. हे मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे 18 वे वर्ष होते. यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा इथोपियाच्या लेमी बरहानु हेले (Lemi Berhanu Hayle) याने जिंकली. त्याने 2 तास 7 मिनिटे 28 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. लेमी बरहानु हेले हा मॅरेथॉन विजेता तसेच टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेता झाला. दुसऱ्या क्रमांकावर केनियाचा फिलेमन रोनो आला. त्याने 2 तास 8 मिनिटे 44 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. तिसऱ्या क्रमांकावर इथोपियाचाच हेलू झेदू आला. त्याने 2 तास 10 मिनिटे 23 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. एलिट भारतीय गटात गोपी टी विजेता झाला.
आज पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2023 सुरू झाली. 42.197 किलोमीटरची मॅरेथॉन होती. यात सर्व प्रकारांमध्ये मिळून एकूण 55 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन या विभागांमध्ये मॅरेथॉन पार पडली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉन स्पर्धेस सुरूवात झाली. अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदर येथून सुरू झाली.
मॅरेथॉनसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मुंबईच्या दक्षिण, मध्य आणि पश्चिम विभागाचे पोलीस आणि वाहतूक पोलीस प्रामुख्याने बंदोबस्तात सहभागी होते. एकूण 540 अधिकारी, 3145 पोलीस कर्मचारी, एसआरपीच्या 18 तुकड्या, आरपीएफच्या 18 तुकड्या, 4 दंगल पथके, बॉम्ब स्क्वाड, डॉग स्क्वाड असा मोठा फौजफाटा तैनात होता. मॅरेथॉनच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात येत होती. मॅरेथॉन शांततेत आणि सुरळीतरित्या पार पडल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.