माफुशी (मालदीव) : भारताचा संघ 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त मालदीव जिंकण्यासाठी पोहोचलाय, पण या स्पर्धेत जयजयकार आपल्या महाराष्ट्राच्याच खेळाडूंचाच असेल. भारतश्री महेंद्र चव्हाण असो किंवा मास्टर्स चॅम्पियन सुभाष पुजारी, मंजिरी भावसार असो किंवा अदिती बंब. एकापेक्षा एक महाराष्ट्राचे खेळाडू भारताचा तिरंगा फडकावण्यासाठी मालदीवच्या भूमीत दाखल झाले आहेत आणि ते निश्चितच अभिमानास्पद कामगिरी करतील, असा विश्वास महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : Team india: दुसऱ्या वनडेत डॉक्टर बनला रोहित शर्मा, स्वत:च केले खांद्याचे उपचार
भारताचा 81 सदस्यीय जम्बो आणि बलाढ्य संघ शुक्रवारीच दाखल झाला. आता पुढचे दोन दिवस वातावरणाशी जुळवत भारतीय खेळाडू जोरदार सराव करतील आणि 18 जुलैला स्पर्धेच्या प्राथमिक चाचणीला उतरतील. आशियातल्या 24 देशांमधून आलेल्या शेकडो खेळाडूंमधूनही प्राथमिक चाचणीच्या अग्नि दिव्यातून महाराष्ट्राचे जास्तीत जास्त खेळाडू सहीसलामात बाहेर पडतील, असेही विक्रम रोठे यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्रच नव्हे तर भारतालाही सर्वाधिक अपेक्षा आहेत त्या भारत श्री महेंद्र चव्हाणकडून. 90 ते 100 किलो वजनीगटात खेळत असलेला आपला महेंद्र या गटात बाहुबली ठरला तर कुणालाच आश्चर्य वाटणार नाही. या स्पर्धेसाठी महेंद्रने गेली तीन महिने प्रचंड मेहनत घेतलीय आणि त्याचे त्याला फळ मिळायला हरकत नसावी, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : Lalit Modi मुळे क्रिकेटचा असा बदलला चेहरा मोहरा , BCCI ची काही वर्षांत केले बिलियनमध्ये उलाढाल
पदकाचा रंग कोणताही असला तरी ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबईकर गणेश पेडामकर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतोय. तोसुद्धा चमकदार कामगिरी करेल, याचा आम्हाला विश्वास आहे, पण सर्वांच्या नजरा असतील महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या सुभाष पुजारींवर. हा खेळाडू आपल्या कामगिरीवर कधीच समाधानी नसतो. प्रत्येक स्पर्धा त्यांच्यासाठी नवे आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. मालदीवमध्येही हा खेळाडू आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर आपला पोलीस खाक्या दाखवेल, असेही रोठे म्हणाले.
अधिक वाचा : Rohit Sharma: रोहितच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड, लॉर्ड्समध्ये असे करणारा दुसरा भारतीय कर्णधार
महाराष्ट्राच्या 9 सदस्यीय संघाला व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत. यशस्वी व्हा, अशा शब्दांत तळवलकरांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना शुभाशिर्वाद दिले आहेत. राज्याच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटेही सोबत आहेत. त्यांना आपल्या खेळाडूंवर दृढ विश्वास असून महिलांच्या गटात मंजिरी भावसार आणि अदिती बंब पदकविजेतीचा मान मिळवतील. तसेच समस्त फिटनेसप्रेमींच्या आदर्श असलेल्या निशरीन पारीख, मास्टर्स गटात खेळत असलेले नरेश नागदेव, पुरूषांच्या स्पोर्टस् फिजीकमध्ये स्वराज सिंग आणि युवराज जाधव हेसुद्धा जबरदस्त तयारीत आहेत. त्यामुळे मालदीवमध्ये जन गण मनचे सूर ऐकायला मिळेलच. सोबत महाराष्ट्राचाही जयजयकार होईल, असेही आपटे यांनी विश्वासाने सांगितले.