Birmingham Commonwealth Games 2022, IND vs. Pak T20 : बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये सुरू असलेल्या महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्धची मॅच आठ विकेट राखून जिंकली. या मॅचमध्ये भारताकडून स्मृती मंधानाने नाबाद ६३ धावा केल्या. याआधी गोलंदाजी करत असताना भारताच्या स्नेह राणाने १५ धावा देत पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना बाद केले.
पावसामुळे २० ऐवजी १८ ओव्हरची मॅच खेळवण्याचा निर्णय झाला. टॉस जिंकून पाकिस्तानने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांची पूर्ण टीम १८ ओव्हरमध्ये ९९ धावा करून गारद झाली. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने स्मृती मंधानाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर ११.४ ओव्हरमध्येच २ बाद १०२ धावा करून मॅच जिंकली.
पाकिस्तानकडून विकेटकीपर आणि सलामीची बॅटर असलेल्या मुनीबा अलीने ३२ तर इरम जावेदने शून्य धावा केल्या. कॅप्टन असलेल्या बिस्माह मारूफने १७, ओमैमा सोहेलने (धावचीत) १०, आयेशा नसीमने १०, आलिया रियाझने (धावचीत) १८, फातिमा सनाने ८, कायनात इम्तियाझने २, डायना बेगने शून्य, टुबा हसनने (धावचीत) १, अनम अमीनाने नाबाद शून्य धावा केल्या. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी २ तर शफाली वर्मा, रेणुका सिंह आणि मेघना सिंह या तिघींनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताकडून शफाली वर्माने १६, स्मृती मंधानाने नाबाद ६३, सब्भिनेनी मेघनाने १४, जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद २ धावा केल्या. पाकिस्तानकडून ओमैमा सोहेल आणि टुबा हसन या दोघींनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये सुरू असलेल्या महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकून पहिला विजय नोंदविला. याआधी भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला होता. ही मॅच ऑस्ट्रेलियाने ३ विकेट राखून जिंकली होती. टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या भारताने २० ओव्हरमध्ये ८ बाद १५४ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाने १९ ओव्हरमध्ये ७ बाद १५७ धावा केल्या.