Mithali Raj Retires | भारतीय महिला क्रिकेट टीममधील (Indian womens cricket team) स्टार खेळाडू आणि टीम इंडियाची कर्णधार मिताली राजनं (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 1999 साली म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी मितालीनं टीम इंडियात प्रवेश केला होता. वयाच्या 23 व्या वर्षी ती टीम इंडियाची कप्तान झाली आणि अनेक विक्रम नावावर केले. न्यूझीलंडमध्ये आयोजित महिला विश्चचषक स्पर्धेत मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला. याच स्पर्धेत मितालीला प्रेक्षकांनी अखेरचं ब्लू जर्सीत खेळताना पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यावर मिताली राजने ‘टाईम्स नाऊ नवभारत’ला सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात क्रिकेटपासून वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी तिने शेअर केल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार मनात आला होता. पण देशासाठी हा वर्ल्डकप खेळण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळे वर्ल्डकप झाल्यावर निवृत्तीची घोषणा करण्याचंं ठरवलं होतं. अर्थात, या वर्ल्डकपमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मात्र तिथून परत येतानाच निवृत्तीची घोषणा करायचं मी नक्की केलं होतं.
23 वर्षांपूर्वी जेव्हा करिअरला सुरुवात केली, तेव्हा महिला क्रिकेटकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन कसा उत्तरोत्तर बदलत गेला, हे मिताली सांगते. अगोदर महिला क्रिकेटर्सना सन्मानाची वागणूकही मिळत नसे. दुय्यम दर्जाच्या खेळाडूंप्रमाणे वागणूक मिळायची. मात्र आता पूर्ण जगात महिला क्रिकेटर्सचा डंका वाजत असून 2017 साली जेव्हा भारताची महिला टीम वर्ल्डकपच्या फायनलला पोहोचली होती, तेव्हापासून हा आदर वाढला असल्याचं ती सांगते.
मी महिला आणि पुरुष अशा तुलनेच्या विरोधात आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातील करिअरबाबत मुलांचा जसा विचार होतो, तसा मुलींबाबत का होत नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. लहानपणापासून मुलींना खेळात करिअर करण्यासाठी प्रवृत्त करणं, प्रोत्साहन देणं ही संस्कृती आपल्याकडे रुजणं गरजेचं आहे. हळूहळू ते होईल, याचा मला विश्वास आहे. महिलांची टीम जेव्हा हरते, तेव्हा महिला असल्याच्या कारणावरून आमच्यावर टीका होते. पुरुषांच्या क्रिकेट टीमबाबत हे कधीच होत नाही. याचा अगोदर राग येत असे. मात्र आता येत नाही. पुरुषांसोबत तुलना केल्याने मला काहीच फरक नाही. मी नेहमीच माझ्या ध्येयाचा विचार करते.
लग्न करण्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात असतो, तसाच माझ्यावरही दबाव होता. मात्र मला फक्त करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. माझे वडील आणि भाऊ यासाठी ठामपणे माझ्या पाठिशी उभे राहिल्यामुळे मला माझं उद्दिष्ट गाठता आलं. नातेवाईकांनी लग्नासाठी खूपच मागे लागले होते. लग्न कर, सेटल हो आणि मग करिअर कर, असा सल्ला अनेकजण द्यायचे. मात्र मला करिअर सोडून इतर काहीच करण्याची इच्छा नव्हती, असं मितालीनं या मुलाखतीत सांगितलं.
अधिक वाचा - Video: आवेश खानच्या घातक बॉलने बॅटचे झाले दोन तुकडे, पाहतच राहिला आफ्रिकन फलंदाज
मिताली राजच्या करिअरवर लवकरच ‘शाबास मिठ्ठू’ नावाचा बायोपिक येत आहे. आपण कसे आहोत, हे आपल्याला माहित असतं, पण इतरांच्या नजरेतून आपण कसे दिसू, याचं थोडं टेन्शन आल्याचं ती म्हणाली. आपली भूमिका साकारणारी तापसी पन्नू ही उत्तम अभिनेत्री आहे, मात्र क्रिकेटर नाही, असंही ती म्हणाली.
आज महिला क्रिकेट ज्या टप्प्यावर आहे, ते पाहून समाधान वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे. आपण योग्य टप्प्यावर क्रिकेट सोडल्याचं सांगत गेल्या 23 वर्षांत महिला क्रिकेटनं केलेला प्रवास समाधानकारक असल्याचं ती सांगते.