Mohammad Siraj : मोहम्मद सिराजने विकसित केले अँडरसनसारखे ब्रह्मास्त्र

Mohammad Siraj developed Brahmastra like Anderson, Difficult for the batter to predict Siraj wobble seam ball : मोहम्मद सिराज अनेकदा वॉबल सीम (wobble seam) नावाच्या ब्रह्मास्त्राचा प्रभावी वापर करतो.

Mohammad Siraj
मोहम्मद सिराजने विकसित केले अँडरसनसारखे ब्रह्मास्त्र  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोहम्मद सिराजने विकसित केले अँडरसनसारखे ब्रह्मास्त्र
  • सिराज अनेकदा वॉबल सीम (wobble seam) नावाच्या ब्रह्मास्त्राचा प्रभावी वापर करतो
  • अँडरसन आणि सिराज यांच्यामुळे वॉबल सीम हा बॉलिंगचा प्रकार बॅटरसाठी कर्दनकाळ

Mohammad Siraj developed Brahmastra like Anderson, Difficult for the batter to predict Siraj wobble seam ball : भारताने न्यूझीलंड विरुद्धची पहिली वन डे मॅच 12 धावांनी जिंकली. या मॅचमध्ये भारताने 50 ओव्हरमध्ये 8 बाद 349 धावा केल्या. न्यूझीलंडची टीम 49.2 ओव्हरमध्ये 337 धावांत ऑलआऊट झाली. मोहम्मद सिराजने पहिल्या मॅचमध्ये 10 ओव्हरपैकी 2 मेडन (निर्धाव षटके) टाकल्या. त्याने 46 धावा देत 4 विकेट घेतल्या. 

मोहम्मद सिराजने पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या डेवोन कॉनवे (10 धावा), टॉम लॅथन (24 धावा), मिचेल सेंटनर (57 धावा) आणि हेनरी शिपली (शून्य धावा) या चौघांना बाद केले. याआधी मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या 3 वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 9 विकेट घेतल्या. यातील 7 विकेट तर त्याने पॉवर प्ले सुरू असतानाच घेतल्या होत्या. सिराज हा 2022 पासून आतापर्यंतच्या वन डे रेकॉर्डनुसार पॉवर प्ले मध्ये विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. नव्या बॉलचा तो प्रभावी वापर करतो. त्याने अँडरसनसारखे ब्रह्मास्त्र विकसित केले आहे.

सिराज अनेकदा वॉबल सीम (wobble seam) नावाच्या ब्रह्मास्त्राचा प्रभावी वापर करतो. वॉबल सीम या प्रकारात बॉलरच्या हातातून सुटल्यापासून पिचवर पहिला टप्पा पडेपर्यंत बॉल कधी थोडा उजवीकडे तरी कधी डावीकडे झुकतो. यामुळे बॅटरचा गोंधळ उडतो. नेमके कसे खेळावे हे समजत नाही आणि बॅटर बाद होण्याची शक्यता वाढते. 

जर बॉलरच्या हातातून सुटल्यापासून पिचवर पहिला टप्पा पडेपर्यंत बॉल विशिष्ट दिशेने आणि विशिष्ट पद्धतीने पुढे गेला तर बॅटरला अंदाज बांधून खेळणे सोपे होते. पण सिराज टाकत असलेल्या बॉलचा अंदाज बांधणे कठीण जाते. यामुळे त्याला विकेट मिळवणे सोपे जाते.

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वन डे मॅचमध्येही सिराजने पॉवर प्ले मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद सिराजचा प्रयत्न वॉबल सीम आणखी प्रभावीरित्या करण्याचा आहे. या संदर्भात श्रीलंकेविरुद्धची तिसरी वन डे झाल्यानंतर तो जाहीरपणे बोलला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचच्या निमित्ताने पन्हा एकदा सिराजने वॉबल सीमचा प्रभावीरित्या वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. 

बॉलच्या सीमवर बॉलरच्या हाताची 2 बोटे व्यवस्थित ठेवलेली असतात तेव्हा तो वेगाने बॉल टाकू शकतो. पण वॉबल सीमसाठी बॉलरला सीम किंवा त्याच्या आसपास ठेवायच्या 2 बोटांमध्ये जास्त अंतर ठेवून बॉल व्यवस्थित पकडावा लागतो. इंग्लंडच्या अँडरसनने हे तंत्र व्यवस्थित आत्मसा करून स्वतःची बॉलिंग अधिकाधिक प्रभावी केली. आता भारताचा मोहम्मद सिराज पण वॉबल सीमच्या जोरावर बॅटरची दाणादाण उडवत असल्याचे दिसत आहे. 

बॉलवर जेवढी लकाकी जास्त असेल तेवढा तो वॉबल सीमसाठी उत्तम समजला जातो. लाल रंगाच्या बॉलद्वारे मॅचमध्ये दीर्घकाळ वॉबल सीम टाकणे शक्य आहे. या उलट पांढऱ्या रंगाच्या बॉलद्वारे तुलनेने कमी वेळ वॉबल सीम टाकता येतात. 

मोहम्मद सिराजने वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 20 मॅच खेळून 37 विकेट घेतल्या आहेत. सिराजच्या आधीपासून वॉबल सीमचे तंत्र प्रभावीरित्या वापरणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने वन डे क्रिकेटमध्ये 194 मॅच खेळून 269 विकेट घेतल्या आहेत. अँडरसन आणि सिराज यांच्यामुळे वॉबल सीम हा बॉलिंगचा प्रकार बॅटरसाठी कर्दनकाळ बनून पुढे येत असल्याचे चित्र आहे.

आकडेवारी 

भारताच्या मोहम्मद सिराजने 20 वन डे खेळून 37 विकेट आणि 15 टेस्ट मॅच खेळून 46 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 194 वन डे खेळून 269 विकेट आणि 177 टेस्ट मॅच खेळून 675 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये पॉवर प्ले सुरू असताना विकेट घेण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहम्मद सिराज कमालीचा यशस्वी ठरत आहे. सिराजने 2022 मध्ये 18 वन डे मधून 23 विकेट पॉवर प्ले दरम्यान घेतल्या आहेत. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने 2022 मध्ये 6 वन डे मध्ये 10 विकेट पॉवर प्ले दरम्यान घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडच्याच मॅट हेनरीने 2022 मध्ये 10 वन डे मधून 10 विकेट पॉवर प्ले दरम्यान घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी