Neeraj Chopra in Paavo Nurmi Games: नवी दिल्ली : भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने ८९.३० मीटर फेकत ही कामगिरी केली. या सामन्यात त्याला रौप्य पदक जिंकण्यात यश आले आहे. पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे स्थापित केलेला ८८.०७ मीटरचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे.पावो नुर्मी गेम्स फिनलंडमधील टॉप ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटपैकी एक मानले जाते. जे १९५७ पासून दरवर्षी आयोजित केले जाते. स्पर्धेदरम्यान नीरज चोप्राने ऑलिव्हर हेलँडरच्या मागे दुसरे स्थान पटकावले. यादरम्यान ऑलिव्हर हेलँडरने ८९.९३ मीटर फेकत पहिले स्थान पटकावले आहे.
भारताच्या नीरज चोप्राने जवळपास दहा महिन्यांनंतर पहिल्या स्पर्धेत पावो नूरमी गेम्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. भालाफेकच्या जगात सुवर्णपदक मानल्या जाणाऱ्या ९० मीटरचा टप्पा त्याने जवळपास गाठला आहे. तर ग्रेनेडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्सने ८६.६० मीटर फेकत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पावो नुर्मी गेम्स दरम्यान, चोप्राने 86.92 मीटर फेकत आपल्या खेळाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने 89.30 मीटरचा पुढील थ्रो फेकला. यानंतर त्याचे पुढील तीन प्रयत्न अयशस्वी झाले. त्याचवेळी त्याने शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात ८५.८५ मीटरचे दोन थ्रो केले. चोप्राच्या 89.30 मीटर भालाफेकने त्याला जागतिक सीझन लीडर्स यादीत पाचव्या स्थानावर नेले आहे.