व्हाइटवॉशला व्हाइटवॉशने उत्तर... 

सलग तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हॉइटवॉशनेच उत्तर दिलं आहे.  टी२० मालिकेतील पराभवाचं उट्टं न्यूझीलंडने वनडे मालिकेत काढलं आहे.

new zealand whitewash india with 3-0 in odi  series ind vs nz third odi match 
व्हाइटवॉशला व्हाइटवॉशने उत्तर...   |  फोटो सौजन्य: AP

माउंट माउंगानुई: भारताने टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवून न्यूझीलंडला व्हॉइटवॉश दिला होता. पण न्यूझीलंडने या पराभवाची परतफेड तात्काळ केली आहे. कारण, वनडे मालिकेत न्यूझीलंडने टीम इंडियाला ३-० असा व्हॉइटवॉश दिला आहे. त्यामुळे एकप्रकारे व्हॉइटवॉशल व्हाइटवॉशनेच उत्तर दिलं आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने ३-० असं निर्भेळ यश मिळवलं आहे. भारताला पहिल्या वनडे सामन्यात चार विकेट, दुसऱ्या वनडे सामन्यात २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

माउंट माउंगानुई येथील तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. यावेळी भारतीय संघाने ५० षटकात ७ विकेट गमावून २९६ धावा केल्या होत्या. यावेळी केएल राहुलने शानदार शतक झळकावलं तर श्रेयस अय्यरने देखील अर्धशतक ठोकलं. या दोघांच्या खेळीच्या जोरावरच टीम इंडियाने २९६ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात देखील भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर मयांक अग्रवाल हा अवघ्या १ धाव करु बाद झाला. तर कर्णधार विराट कोहली देखील झटपट बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाला फार मोठी धावसंख्या रचता आली नाही. 

दरम्यान, २९७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय चांगली झाली. यावेळी मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी १०६ धावांची भागीदारी करुन विजयाचा पाया रचला. यावेळी निकोल्सने ८० धावा केल्या तर गप्टिल ६६ धावा करुन बाद झाला.  

मात्र डी ग्रँडहोम आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त फटकेबाजी करुन न्यूझीलंडला सलग तिसरा विजय मिळवून दिला. अवघ्या २८ चेंडूत ५८ धावा केल्या यावेळी त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. या मालिका विजयामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत आता कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी