टी-२०मध्ये हिरो, वनडेत झिरो; टीम इंडियाने वनडे मालिका गमावली! 

:INDvsNZ: ऑकलंडमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारताने ही वनडे मालिका देखील गमावली आहे.

new zealand won by 22 runs against india in auckland
टी-२०मध्ये हिरो, वनडेत झिरो; टीम इंडियाने वनडे मालिका गमावली!   |  फोटो सौजन्य: AP

ऑकलंड: न्यूझीलंडमध्ये ५-० ने अशी टी-२० मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला वनडे मालिकेत मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण की, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला न्यूझीलंडकडून सलग दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दुसरा सामना टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणफेकीचा कौल देखील भारताच्याच बाजूने लागला. यावेळी भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला ५० षटकात २७३ धावांपर्यंतच मजल मारली. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २५१ धावांवरच आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना २२ धावांनी जिंकला. या पराभवामुळे भारताला वनडे मालिका देखील गमवावी लागली आहे. 

न्यूझीलंडने दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघ आरामात पार करेल असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र, वरच्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली. चांगली सुरुवात करुन देखील सलामीवीर पृथ्वी शॉला मोठी खेळी करता आली नाही. तर मयांक अग्रवाल देखील अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि नंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार विराट कोहली देखील झटपट बाद झाला. दरम्यान, श्रेयस अय्यर देखील अर्धशतक झळकावून माघारी परतला. दरम्यान, त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जाडेजाने नवदीप सैनीच्या साथीने टीम इंडियाचा डाव सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न केला. याचवेळी सैनीने देखील जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ४९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ५ चौकार आणि दोन शानदार षटकार मारले. दुसरीकडे जाडेजाने देखील ५५ धावांची खेळी केली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. दरम्यान, न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. बेनेट, साऊदी, जेमिसन आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर गप्टिलने ७९ धावांची खेळी केली. तर निकल्स ४१ धावा करुन बाद झाला. यानंतर न्यूझीलंडचा संघ गडगडला. मात्र, त्यांचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर याने तळाच्या फलंदाजाच्या साथीने चांगली भागीदारी करुन आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. यावेळी भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर शार्दुल ठाकूरने दोन गडी बाद केले.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी