भारताचे नितिन मेनन ICCचे सर्वात तरुण भारतीय एलिट पंच

Nitin Menon ICC elite panel भारताचे नितिन मेनन ICCच्या २०२०-२१ हंगामाच्या एलिट पंचांच्या पॅनलमध्ये दाखल झाले

nitin menon
भारताचे नितिन मेनन ICCचे सर्वात तरुण भारतीय एलिट पंच 

थोडं पण कामाचं

  • भारताचे नितिन मेनन ICCचे सर्वात तरुण भारतीय एलिट पंच
  • फक्त ३६ वर्षांचे आहेत नितिन मेनन, २३व्या वर्षी झाले पंच
  • ३ कसोटी सामने, २४ एकदिवसीय सामने आणि १६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने यात पंच म्हणून काम करण्याचा अनुभव

नवी दिल्ली: भारताचे नितिन मेनन (nitin menon) आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामकांच्या (International Cricket Council) २०२०-२१ हंगामाच्या एलिट पंचांच्या पॅनलमध्ये (elite panel of icc umpire) दाखल झाले आहेत. ते आयसीसीच्या एलिट पंचांच्या पॅनलमधील सर्वात तरुण भारतीय पंच आहेत. 

मेनन यांची पंच म्हणून चांगली कारकिर्द

मेनन फक्त ३६ वर्षांचे आहेत. त्यांनी ३ कसोटी सामने, २४ एकदिवसीय सामने आणि १६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने यात पंच म्हणून काम केले आहे. आयसीसीच्या एलिट पंचांच्या पॅनलमध्ये दाखल झालेले ते तिसरे भारतीय पंच आहेत. याआधी आयसीसीच्या एलिट पंचांच्या पॅनलमध्ये भारताचे श्रीनिवास व्यंकटराघवन आणि सुंदरम रवी हे दोघेजण होते. 

स्वप्न पूर्ण झाल्याचा मेनन यांना आनंद

जगातील दिग्गज आणि अनुभवी पंचांसोबत काम करण्याचा अनुभव घेण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद वाटत आहे, असे मेनन यांनी निवड जाहीर झाल्यावर सांगितले.

मेनन यांनी २२व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते २३व्या वर्षी पंच झाले. पंच झाल्यावर त्यांनी क्रिकेट खेळणे सोडून पंच म्हणून उत्तम काम करण्यावर लक्ष केंद्रीत केले. अल्पावधीत ते वरिष्ठ पंच (सिनिअर अंपायर) झाले. 

पाच कसोटी सामन्यांसाठी पंच म्हणून काम करणार

आयसीसीचे ज्‍योफ एलरडाइस, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर, सामनाधिकारी रंजन मदुगले आणि डेव्हिड बून यांच्या समितीने नितिन मेनन यांची निवड केली. मेनन इंग्लंडच्या भारत दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांसाठी पंच म्हणून काम करतील. या व्यतिरिक्त त्यांना अॅशेस मालिकेत पंच म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. मात्र अॅशेसमधील संधी ही कोरोना संकटावर अवलंबून आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शक्यतो स्थानिक अनुभवी पंचांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून संधी देण्याचे धोरण आयसीसीने जाहीर केले आहे. भविष्यात परिस्थितीचा आढावा घेऊन हे धोरण बदलले जाईल, असे आयसीसीने जाहीर केले आहे. जर स्थानिक पंचांना संधी मिळाली तर यंदाच्या हंगामात अॅशेसमध्ये पंच करण्याची संधी मेनन यांना मिळणार नाही.

मेनन यांची क्रिकेटपटू म्हणून छोटी कारकिर्द

माजी आंतरराष्ट्रीय पंच नरेंद्र मेनन यांचे चिरंजीव नितिन यांना मध्य प्रदेशकडून दोन लिस्ट ए सामने खेळता आले. नंतर २००६ मध्ये बीसीसीआयने तब्बल दहा वर्षांनंतर पंच पदासाठी परीक्षा घेतली. वडिलांनी नितिन यांना ही संधी सोडू नको असा सल्ला दिला. मनापासून मेहनत घेऊन पंच पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नितिन बीसीसीआयचे पंच झाले. 

पंच म्हणून उत्तम कामगिरी करण्यावर अवलंबून आहे पुढील कारकिर्द

शाळेत असताना १३व्या वर्षी क्रिकेटपटूच व्हायचे असा ठाम निर्णय घेतलेल्या नितिन यांनी २२व्या वर्षी क्रिकेटपटू म्हणून सुरुवात केली आणि २००६ मध्ये २३व्या वर्षी ते पंच झाले. पंच झाल्यानंतर त्यांनी खेळाडू म्हणून करिअर करण्याचा विचार सोडून दिला आणि पूर्ण वेळ पंच म्हणून उत्तम कामगिरी करण्यावर भर दिला. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन आयसीसीने त्यांना एलिट पंचांच्या पॅनलमध्ये एका वर्षासाठी सहभागी करुन घेतले आहे. भविष्यात एलिट पॅनलमधील त्यांचा कार्यकाळ आणखी वाढू शकतो. मात्र या संदर्भातले निर्णय मेनन पंच म्हणून कसे काम करतात, यावर अवलंबून आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी