Novak Djokovic Won Wimbledon 2022 beat Nick Kyrgios, Djokovic won 21st Grand Slam title : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरी गटातला अंतिम सामना जिंकत विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. हे जोकोविचचे २१वे ग्रँडस्लॅम आहे. तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नदाल २२ ग्रँडस्लॅमसह पहिल्या स्थानावर आहे. फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या स्थानावर आहे.
जोकोविचने विम्बल्डन २०२२च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला. किर्गिओसच्या प्रभावी सर्व्हिसमुळे पहिला सेट गमावणाऱ्या जोकोविचने नंतर लागोपाठचे तीन सेट जिंकत बाजी मारली.
यंदाच्या विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात (क्वार्टर फायनल मॅच) पहिले दोन सेट गमावून तर उपांत्य सामन्यात (सेमी फायनल मॅच) आणि अंतिम सामन्यात (फायनल मॅच) पहिला सेट गमावूनही जोकोविचने बाजी मारली. याआधी २०१९च्या अंतिम सामन्यातही फेडररकडे दोन चॅम्पियनशिप गुण असूनही जोकोविचने प्रतिकार केला होता. यावेळीही तो पहिला सेट गमावल्यानंतर डगमगला नाही. उलट दुसऱ्या सेटपासून त्याने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली.
किर्गिओसची बडबड सुरू होती, त्याने पंचांशी वाद घातला पण जोकोविच शांत होता. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने ०-४० पिछाडीनंतर गेम जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसवर किर्गिओस ४०-० आघाडीवर असताना जोकोविचने तोही गेम जिंकला. किर्गिओसने सामन्यातील सर्वात वेगवान १३६ मैल वेगाची सर्व्हिस केली. त्याच्या ३० बिनतोड सर्व्हिस होत्या, पण जोकोविचने सामन्यावरील पकड ढळू दिली नाही आणि बाजी मारली.
किर्गिओसने पहिल्या सेटमध्ये ४०-० असे आघाडीवर असताना दोन पायातून चेंडू मारून सर्व्हिस केली. ही अंडरआर्म सर्व्हिस पाहून उपस्थितांनी त्याची हुर्यो उडवली. जोकोविचने या सर्व्हिसवरील गुण जिंकला. मात्र, किर्गिओसने हा गेम जिंकण्यात यश मिळवले. पण पुढे अंतिम सामना जिंकण्यात किर्गिओस अपयशी ठरला. जोकोविचने बाजी मारली.