NZ vs IND, 1st ODI: पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा पराभव, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

New Zealand vs India 1st ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे मालिकेतील पाहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडियाने दिलेलं ३४८ धावांचं आव्हान किवी फलंदाजांनी आरामात पार केलं.

nz vs ind 1st odi ross taylor century erased victory from team india new zealand leads in series
NZ vs IND, 1st ODI: पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा पराभव, न्यूझीलंडचा दणदणीत विजय  |  फोटो सौजन्य: AP

हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ५-० असं निर्भेळ यश मिळविणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच वनडे सामन्यात मोठा झटका बसला आहे. हॅमिल्टन येथे रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने ४ गडी शिल्लक ठेवून भारतावर दणदणीत विजय मिळवला. यावेळी न्यूझीलंडने तब्बल ३४७ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज रॉस टेलर याच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने हा विजय संपादन केला. यावेळी टेलरने अवघ्या ८४ चेंडूत नाबाद १०९ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

टी-२० मालिका गमावल्यामुळे वनडे मालिकेत यश मिळवायचंच या इराद्याने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण यावेळी भारतीय संघाने तब्बल ३४७ धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. पण दोघेही सलामीवीर माघारी परतल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रॉस टेलरने कर्णधार टॉम लेथमच्या साथीने चांगली भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लेथमने देखील ४८ चेंडूत ६९ धावा केल्या. मात्र, लेथम बाद झाल्यानंतर देखील टेलरने शेवटपर्यंत किल्ला लढवत न्यूझीलंडला दणदणीत विजय मिळवून दिला. यावेळी सलामीवर निकोल्सने देखील ८२ चेंडूत ७८ धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर ३४७ धावा केल्या. यावेळी कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनीही अर्धशतकं झळकावली. दरम्यान, या सामन्यात मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याच दोघांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात देखील केली. यावेळी पृथ्वीने २० धावा केल्या तर मयंकने ३२ धावा केल्या. मात्र, चांगली सुरुवात मिळून देखील दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. 

दरम्यान, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरीही भारतीय गोलंदाजांना मात्र, आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा याला एकही बळी मिळवता आला नाही. तसंच रवींद्र जडेजा देखील एकही गडी बाद करु शकला नाही. तर फिरकीपटू कुलदीप यादव याच्या दहा ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल ८४ धावा वसूल केल्या. तर शार्दुल ठाकूरने आपल्या ९ ओव्हरमध्ये तब्बल ८० धावा दिल्या. त्यामुळे एवढी मोठी धावसंख्या उभारुन देखील भारताला विजय मिळवता आला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी