मालदीव: भारत-पाकिस्तान यांच्यात जे वैर आहे ते केवळ राजकीय पातळीवर आहे आणि ते फक्त आणि फक्त भारत आणि पाकिस्तानातच आहे. मात्र आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही भेटतो, तेव्हा एक असतो. आम्ही एकत्र जेवतो, एकत्र उठतो-बसतो, एकत्र खेळतासुद्धा आणि एकमेकांना प्रोत्साहन देतो. खेळाला खेळाच्या दृष्टिकोनातूनच पाहायला हवं. त्यामुळे आम्ही तर भारतीयांची मेहमाननवाजी करायला उत्सुक आहोत. त्यांनीही पुढाकार घेऊन एकमेकांच्या देशात थांबलेले खेळसंबंध पुन्हा सुरू करावेत, असे आवाहन पाकिस्तानी संघाने केले आहे.
मालदीव येथे 54 वी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा खेळायला पाकिस्तानचा सहा सदस्यीय संघ दाखल झाला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पाकिस्तानी संघाची भेट होताच त्यांचा स्टार खेळाडू सय्यद फझल इलाही भारत-पाकिस्तानमधील खेळ संबंधाविषयी आपलं मत मांडलं. इलाही म्हणाला, हमे आपकी मेहमाननवाजी का मौका दो और हमारे खिलाडियोंके लिए इंडिया के दरवाजे खोल दो. भारतात शरीरसौष्ठवाच्या खूप मोठ-मोठ्या स्पर्धा होतात. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय आणि सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे आम्हाला अनेक वर्षे इच्छा असूनही व्हिसा मिळत नाही. खेळायचं असूनही खेळता येत नाही. या संबंधामुळे आमच्या चांगल्या खेळाडूंना या स्पर्धांना मुकावे लागत आहे. ज्यामुळे आमच्या खेळाडूंचे वारंवार नुकसान होत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे, असे कळकळीचे आवाहन पाक खेळाडूने केलं.
Read Also : शिवलिंगावर जलभिषेक करताना हे नियम ठेवा लक्षात
फझल इलाही पुढे म्हणाला, आम्ही मालदीवमध्ये मैत्रीची स्पर्धा खेळायला आलो आहोत. प्रेमाचे संबंध जपायला आलो आहोत. आमच्या दोन्ही देशांत असलेले कटू संबंध फक्त दोन्ही देशातच असतात. आम्ही या दोन्ही देशांबाहेर नेहमीच एक असतो. जसे आम्ही जगाच्या पाठीवर मैत्रीपूर्ण संबंध जपतो, तसेच संबंध आम्हाला एकमेकांच्या देशात जपायला मिळायला हवेत. जर आम्ही भारतात खेळलो तर आम्हाला आमच्या कामगिरीत सुधारणा करता येईल.
Read Also: भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला
जागतिक पातळीवर आमच्या देशाच्या कामगिरीत निश्चितच प्रगती होईल. भारतासारखे टॅलेंट पाकिस्तानातही आहे, पण आमच्या खेळाडूंना स्वताला सिद्ध करण्याची फार कमी संधी मिळते. त्यामुळे आमचे खेळाडू काहीसे मागे आहेत. भारत-पाकिस्तानने आपले राजकीय वैर बाजूला ठेऊन दोघांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणाऱया खेळांना एकमेकांच्या देशात खेळवायला सुरूवात करावी. याचा फायदा दोन्ही देशांना होईल. त्यामुळे या सर्वांपासून खेळाला दूर ठेवावे, असे आवाहनही इलाहीने दोन्ही देशांतील राजकीय नेत्यांना केले. या स्पर्धेत पाकिस्तान संघातून शहझाद कुरेशी, अरसलान बेग, मुदस्सिर खान, मोहम्मद अझीम आणि उमर शहझाद हे आपल्या पीळदार स्नायूंचे प्रदर्शन करणार आहेत.