न्यूझीलंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघातील ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Pakistan Cricket: बाबर आझम यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ मंगळवारी न्यूझीलंडला दाखल झाला पण त्यांच्या संघातील ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

pcb
न्यूझीलंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघातील ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरस चाचणीत पाकिस्तानचे ६ क्रिकेटपटू पॉझिटिव्ह
  • न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानच्या खेळाडूंवर प्रोटोकॉल तोडल्याचा केला आरोप 
  • पाकिस्तानी क्रिकेटपटूंना काही काळ आयसोलेट व्हावं लागणार

क्राइस्टचर्च: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तपासणीत पाकिस्तानचे सहा क्रिकेटपटू पॉझिटिव्ह (Pakistan six cricketers covid-19 positive) असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने असा आरोप केला आहे की, त्यांनी बायोसेफ्टी प्रोटोकॉल तोडला आहे आणि आता काही काळ त्यांना आयसोलेट करावं लागेल.  त्यामुळे ते सराव करू शकणार नाहीत.

बाबर आजम याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ मंगळवारी न्यूझीलंडला दाखल झाला आणि १४ दिवस आयसोलेट असणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे की, 'या सहा चाचणीपैकी दोन जुने आणि चार नवीन निकाल आहेत.' दरम्यान, कोणत्या खेळाडूंना लागण झाली आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. कारण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. 

या सर्व खेळाडूंना आयसोलेशन केंद्रावर पाठविण्यात आले आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडमध्ये  तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड क्रिकेटने याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, 'या क्षणी पाकिस्तानी संघ सराव करू शकणार नाही. चाचणी पूर्ण होईपर्यंत त्यांना सरावास बंदी घालण्यात आली आहे.'

निवेदनात म्हटले आहे की, 'न्यूझीलंड क्रिकेटला हे कळले आहे की, पाकिस्तान संघातील काही सदस्यांनी आयसोलेशनच्या पहिल्याच दिवशी प्रोटोकॉल तोडला आहे. आम्ही त्यांच्याशी बोलू आणि प्रोटोकॉलच्या काय अटी आहेत ते स्पष्ट करू.' यापूर्वी इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे दहा क्रिकेटर्स पॉझिटिव्ह आढळून आले होते.

टीम इंडियाचं आस्ट्रेलियातील आयसोलेशन पूर्ण 

दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. आजच (२६ नोव्हेंबर) भारतीय संघाने आपलं १४ दिवसाचं आयसोलेशन पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण संघ नव्या हॉटेलमध्ये रवाना झालं आहे. भारताच्या या बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्याची उद्यापासून सुरुवात होणार आहे. सिडनीमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे या सामन्यात मर्यादित संख्येतच प्रेक्षक उपस्थित असतील. 

जैविकदृष्ट्या सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाल्याने आता भारतीय खेळाडूंना थोडीशी सूट मिळणार आहे. ज्यामुळे आता त्यांना एकत्र जेवण करता येणार आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला थेट ऑस्ट्रेलियाला जावं लागलं आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या एकूण हा संपूर्ण दौरा भारतीय टीमसाठी दमछाक करणारा असणार आहे. मात्र, असलं तरीही यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारण्यास पराकोटीचे प्रयत्न करतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी