'मॅच खेळलास तर तुझी बोटं तोडून टाकू', अश्विनला कुणी दिली होती भयंकर धमकी?

R Ashwin: भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज आर. अश्विन याने नुकतंच एका घटनेबाबत खुलासा केला आहे. सुरुवातीच्या काळात टेनिस क्रिकेटची फायनल खेळू नये म्हणून अश्विनचे अपहरण देखील करण्यात आले होते.  

r ashwin was abducted by the opposition team for not playing tennis cricket finals
'तर तुझी बोटं तोडून टाकू', अश्विनला कुणी दिली होती धमकी?  |  फोटो सौजन्य: AP, File Image

मुंबई: टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटून रवीचंद्रन अश्विन याने आपल्या गोलंदाजीविषयी आणि आपल्या क्रिकेटमुळे कोणत्या-कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं याबाबत काही किस्से सांगितले आहेत.  ७० कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ३६२ विकेट घेणाऱ्या अश्विनने नुकतंच क्रिकबझला विशेष मुलाखत दिली, यावेळी त्याने एक भयंकर आठवण सांगितली. 

लेदर बॉल क्रिकेट खेळण्याआधी आर. अश्विन हा टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. पण त्याचा वडिलांना हे अजिबात आवडायचं नाही. 'त्यांना कधीही मी रस्त्यावर क्रिकेट खेळलेलं आवडायचं नाही. पण त्याच दरम्यान, एकदा आमची टीम फायनलमध्ये पोहचली होती. मॅचसाठी मी घरातूनच निघणार होतो की, तेव्हा चार-पाच मुलं ही रॉयल एनफिल्ड बुलेटवरुन माझ्या घराजवळ आले. त्यावेळी मी त्यांना विचारालं की, तुम्ही कोण आहात? तर यावेळी त्यांनी मला सांगितलं की, तू मॅच खेळणार आहेस ना?, आम्ही तुला घेण्यासाठी आलो आहोत. मला वाटलं. क्या बात है.. मला फायनल सामन्यासाठी लोकं घ्यायला आली आहेत.' 

अश्विन पुढे असं म्हणाला की, 'ती लोकं मला घेऊन निघाले आणि त्यांनी एका स्टॉलवर ते थांबले. त्यांनी माझ्यासाठी जेवणं ऑर्डर केलं. जेव्हा मी त्यांना निघण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांनी मला नकार दिला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, आम्ही विरोधी टीममधील आहोत. तू फायनल खेळू नये यासाठी आम्ही तुला इथे घेऊन आलो आहोत. जर मॅच खेळण्यासाठी गेलास तर तुझ्या हाताची बोटं आम्ही तोडून टाकू.' दरम्यान, त्या मुलांनी अश्विनसोबत असं काहीही केलं नाही. नंतर त्यांनी त्याला पुन्हा घरी सोडलं. 

दरम्यान, त्याचवेळी त्याने आपल्या कॅरम बॉलबाबत देखील एक गुपित सांगितलं. अश्विन आपल्या गोलंदाजीत नेहमीच प्रयोग करत असतो. पण तो जेव्हा कॅरम बॉल टाकतो तेव्हा अनेक दिग्गज फलंदाजांना तो खेळणं कठीण होतं. याच कॅरम बॉलबाबत अश्विनने एक खुलासा केला आहे. अश्विनने सांगितलं की, टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाने त्याला हा कॅरम बॉल शिकवला होता. अश्विन या मुलासोबत मैदानात नेहमी खेळायचा. 

'मी जेव्हा पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो तेव्हा मी फलंदाजी करत होतो. त्यावेळी तिथे एक मुलगा होता जो चांगल्या अॅक्शनने गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू हा सारखा इन स्विंग होत होता. तो सतत चेंडू दोन्ही दिशेला फिरवत होता. मला माहित नाही सध्या तो मुलगा कुठे आहे ते पण आजवर मी त्याच्यासारखा गोलंदाज पाहिलेला नाही. त्याचं नाव एसके होतं. त्यानेच मला कॅरम बॉल शिकवला होता.' असं अश्विन म्हणाला. 

'टेनिस क्रिकेटमध्ये माझं बरंच नाव होतं. पण त्या गोलंदाजाने त्याच्या कलेने मला खूप भंडावून सोडलं होतं. त्यानंतर मी त्या मुलाकडून गोलंदाजी शिकलो. मी रोज सकाळी त्या मुलाकडे कॅरम बॉल शिकण्यासाठी जायचो. तो जवळजवळ १०-१५ दिवस दररोज सकाळी मला कॅरम बॉल शिकवण्यासाठी यायचा.' दरम्यान, यावेळी अश्विनने आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी