R Ashwin's Test cricket record मुंबई : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (IND vs NZ 2रा कसोटी) मोठी कामगिरी केली. अश्विनने दुसऱ्या डावात किवी संघाचा सलामीवीर विल यंगला बळी ठरविताच त्याने यावर्षी कसोटीच्या फॉरमॅटमध्ये 50 बळी पूर्ण केले. विशेष म्हणजे एका बाबतीत त्याने भारताचा दिग्गज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेलाही मागे टाकले आहे. (IND vs NZ: R Ashwin overtakes Anil Kumble, breaks Harbhajan Singh's record of 417 Test wickets)
रविचंद्रन अश्विन आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा कसोटी स्वरूपात 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. एका कॅलेंडर वर्षात अश्विनने 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेने तीनदा ही अप्रतिम कामगिरी केली आहे. कुंबळेने 1999, 2004 आणि 2006 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले.
ऑफस्पिनर हरभजन सिंगनेही तीनदा ही कामगिरी केली आहे. त्याने 2001 आणि 2002 मध्ये सलग दोन वर्षे 50 हून अधिक कसोटी बळी घेतले. त्यानंतर 2008 मध्येही त्याने असाच पराक्रम केला होता. माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांनी 1979 आणि 1983 मध्ये दोनदा ही कामगिरी केली आहे. याशिवाय अश्विन भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेचा वानखेडे स्टेडियमवर कसोटीत ३८ बळी घेण्याचा विक्रमही मोडू शकतो. तो यापासून एक विकेट दूर आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ३ बळी घेतले आहेत. यासह त्याच्या वानखेडे स्टेडियमवर 37 विकेट्स आहेत. या यादीत कपिल देव (28 विकेट), हरभजन सिंग (24 विकेट) तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
अश्विनने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी त्याने कानपूर कसोटीतही 6 बळी घेतले होते. या कसोटीत त्याने हरभजन सिंगचा कसोटीत ४१७ बळींचा विक्रम मोडला. अनिल कुंबळे (६१९ बळी) आणि कपिल देव (४३४ विकेट) यांच्यानंतर तो आता भारताच्या कसोटीतील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.