ICC U19 World Cup : विश्वचषकात शिखर धवनचा १८ वर्षांचा जुना विक्रम मोडित; राज बावाने रचला इतिहास

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 23, 2022 | 16:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC Under 19 World Cup 2022 | आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय फलंदाज राज बावाने इतिहास रचला आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने युगांडाविरुद्ध ३२६ धावांच्या फरकाने मोठा विजय तर मिळवला सोबतच १८ वर्षांपूर्वीचा शिखर धवनचा विक्रमही मोडीत काढला आहे.

 Raj Bawa breaks Shikhar Dhawan's 18-year-old record in ICC U19 World Cup
अंडर-१९ विश्वचषकात शिखर धवनचा १८ वर्षांचा विक्रम मोडित   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय फलंदाज राज बावाने इतिहास रचला आहे.
  • राज बावाने १०८ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १६२ धावांची नाबाद खेळी केली.
  • राज बावाची ही खेळी अंडर-१९ विश्वचषकातील ८ वी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली

ICC Under 19 World Cup 2022 | टारूबा : आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२२ मध्ये (ICC Under 19 World Cup 2022) भारतीय फलंदाज राज बावाने (Raj Bawa) इतिहास रचला आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने युगांडाविरुद्ध ३२६ धावांच्या फरकाने मोठा विजय तर मिळवला सोबतच १८ वर्षांपूर्वीचा शिखर धवनचा विक्रमही मोडित काढला आहे. (Raj Bawa breaks Shikhar Dhawan's 18-year-old record in ICC U19 World Cup).  

भारतीय फलंदाजांची शानदार खेळी

या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने १४४ धावा तर राज बावाने नाबाद १६२ धावांची शतकीय खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे दोघांनीही शतकीय खेळी करून तिसऱ्या बळीसाठी २०६ धावांची भागीदारी नोंदवली. त्यांच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने शनिवारी अंडर-१९ विश्वचषकात ग्रुप बी मध्ये आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात युगांडाविरूध्द पाच बळी गमावून ४०५ धावांची विशाल धावसंख्या उभारली. 

या खेळाडूंचा राहिला दबदबा 

यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने (Angkrish Raghuvanshi)  १२० चेंडूत २२ चौकार आणि चार षटकारांसह शानदार शतक झळकावले. तर हरनूर सिंह १५ आणि निशांत सिंधू १५ धावांवर बाद झाल्यानंतर राज बावाने अंगक्रिशला चांगली साथ दिली आणि डावाच्या शेवटपर्यंत एकत्र राहिले. 

राज बावाने मोडला शिखर धवनचा विक्रम

राज बावाने (Raj Bawa) १०८ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १६२ धावांची नाबाद खेळी केली. अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात राज आता भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने या खेळीसह शिखर धवनचा (Shikhar Dhawan) २००४ मधील विक्रम मोडित काढला आहे. 'गब्बर धवनने ढाका येथे स्कॉटलंडविरुद्ध १५५ धावांची नाबाद खेळी खेळली होती. मात्र आता राज बावाने त्याला मागे टाकले आहे.

टुर्नामेंटमधील ८ वी सर्वाधिक धावसंख्या 

राज बावाची ही खेळी अंडर-१९ विश्वचषकातील ८ वी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. ज्यामध्ये श्रीलंकेच्या (Sri Lanka) हसिथा बोयागोडाने (Hasitha Boyagoda) स्पर्धेच्या मागील हंगामात केनियाविरुद्ध (Kenya) १९१ धावा केल्या होत्या. एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बोयागोडा अव्वल स्थानी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी