पाकिस्तानी क्रिकेटपटूविषयी अश्विनने केलेले विधान झाले व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 21, 2020 | 10:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अव्वल फलंदाज बाबर आझम याचे कौतुक केले

avichandran Ashwin praises Pakistani cricketer Babar Azam
अश्विनने केले बाबर आझमचे कौतुक  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याचे कौतुक केले
  • कर्णधारपदाचा दबाव असूनही बाबर आझम फलंदाजीसह सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला - अश्विन
  • अश्विनच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सज सादिक यांनी केले ट्वीट

नवी दिल्ली: क्वचितच दिसून येते की भारतीय क्रिकेटरने एका पाकिस्तानी क्रिकेटरची मनापासून स्तुती केली आहे. नुकतेच रविचंद्रन अश्विनने याच संदर्भात एक विधान केले आणि बघता बघता ते विधान व्हायरलही झाले. एका ट्विटनुसार, भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अव्वल फलंदाज बाबर आझम याचे कौतुक केले आहे. या २६ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाला अलिकडेच कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले, याचा अर्थ असा की आता तो या तीनही प्रकारातील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आहे. 

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ आणि त्यानंतर श्रीलंकेच्या टी -२० मालिकेत सिनियर खेळाडूविना झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट हादरले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ताबडतोब सरफराज अहमदच्या जागी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बाबर आझमची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आणि गेल्या आठवड्यात पीसीबीने अझर अलीकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि बाबरकडे कसोटी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली.

अश्विनने बाबरचे कौतुक केले

कर्णधारपदाचा दबाव असूनही बाबर आझम फलंदाजीसह सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्व दिग्गजांनी या फलंदाजाची स्तुती केली. भारतीय क्रिकेटपटूंपैकी आतापर्यंत कोणीही बाबरचे कौतुक केले नाही, परंतु एका ट्विटनुसार अश्विनने ते केले आहे. अश्विनच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सज सादिक यांनी ट्विट केले. या ट्विटनुसार अश्विनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'एक उच्च दर्जाचा खेळाडू बऱ्याच दिवसानंतर पाकिस्तानी संघात सामील झाला आहे आणि त्याचे नाव बाबर आझम आहे. तो 'मिलियन डॉलर प्लेअर' असल्याचे दिसत आहे. जेव्हा मी बाबरला खेळताना पाहतो तेव्हा मला फार आनंद होतो, त्याचा खेळ नेत्रसुखद आहे.'

बाबरची आत्तापर्यंतची कामगिरी 

बाबर आझम याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने आतापर्यंत २९ कसोटी सामन्यांमध्ये २०४५ धावा, ७७ एकदिवसीय सामन्यात ३५८० धावा आणि ४४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६८१ धावा केल्या आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १७ शतके आणि ४७ अर्धशतके झळकावली आहेत. अनेकवेळा त्याची तुलना भारताचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याच्याशी केली गेली आहे, पण वास्तव असे आहे की विराट कोहलीच्या आकड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बाबरला खूप कष्ट करावे लागतील. कोणत्याही फलंदाजाला विराटच्या पातळीशी सामना करणे सोपे नाही.

अलिकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीने बाबर आझमला कसोटीची कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. यावर बाबरने प्रतिक्रिया दिली की 'ते (PCB) मला म्हणाले की मला उघडपणे कर्णधारपदाची परवानगी देण्यात आली आहे, संघात कोणताही दबाव किंवा दुफळी नाही.' गेल्या आठवड्यात कराची किंग्जनेही बाबरच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) प्रथमच जिंकली होती. अंतिम सामन्यात तो ‘सामनावीर’ तसेच 'मालिकावीर' ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी