'हिटमॅन' रोहितने मोडला क्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, बनला टी-20 चा सिक्सर किंग

Rohit Sharma: टीम इंडियाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल याच्या नावावर होता.

Rohit Sharma
रोहित शर्मा  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • हिटमॅन रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड
  • रोहित शर्माने क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला
  • टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत सीरिजही जिंकली

फ्लोरिडा: 'हिटमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा बॅट्समन बनला आहे. रोहित शर्माने हा कारनामा अमेरिकेतील फ्लोरिडा येथील लॉडरहिल स्टेडियममध्ये केला आहे. टीम इंडियाची वेस्ट इंडिज सोबत सध्या टी-20 मॅचेसची सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला

रोहित शर्मा याने 95 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचेसमध्ये आतापर्यंत 106 सिक्सर लगावले आहेत. रोहित शर्माच्या आधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल याच्या नावावर होता. क्रिस गेल याने 58 टी-20 मॅचेसमधील 54 इनिंगमध्ये 105 सिक्सर लगावले होते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये रोहित शर्माने सिक्सर लगावत क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सिक्सर किंग बनला आहे.

रोहितला खेळाव्या लागल्या अधिक मॅचेस

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मॅचेसच्या सीरिजमधील दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माने कीमो पॉल याच्या बॉलिंगवर सिक्सर लगावला आणि गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतर सुनील नरेन याच्या बॉलिंगवर रोहित शर्माने पुन्हा सिक्सर लगावला. हा सिक्सर लगावताच रोहितने गेलचा रेकॉर्ड मोडला आणि टी-20 चा सिक्सर किंग बनला.

न्यूझीलंडचा गप्टीलही शर्यतीत

क्रिस गेलला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला गेल पेक्षा 28 मॅचेस अधिक खेळाव्या लागल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्याच्या यादीत गेल नंतर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा बॅट्समन मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलने 76 मॅचेसमध्ये 103 सिक्सर लगावले आहेत.

सीरिजमध्ये गेल नाही 

रोहित शर्मा याने गेल्या मॅचमध्ये दोन सिक्सर लगावत मार्टिन गप्टिल याला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर गेललाही मागे टाकत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि टीम इंडियात सुरू असलेल्या टी-20 सीरिजमध्ये क्रिस गेल खेळत नाहीये. क्रिस गेल वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सीरिजमध्ये गेल खेळला असता तर रोहित शर्माला आणखीन संघर्ष करावा लागला असता.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक सिक्सर

  1. रोहित शर्मा - 106
  2. क्रिस गेल - 105
  3. मार्टिन गप्टिल - 103
  4. कोलिन मुन्रो - 92
  5. बँडन मॅक्युलम - 91 

वेस्ट इंडिजवर विजय

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (4 ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने प्रथम टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हर्समध्ये 167 रन्स केले. टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या टीमची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे दोन विकेट्स फटाफट आऊट झाले. त्यानंतर रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी टीमला सावरलं मात्र, नंतर ते सुद्धा माघारी परतले. 15.3 ओव्हर्सनंतर अचानक पावसाला सुरूवात झाली आणि मॅच रोखण्यात आली. पाऊस थांबतच नसल्याने अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे टीम इंडियाला 22 रन्सने विजयी घोषित करण्यात आलं. या विजयासोबतच टीम इंडियाने टी-20 सीरिजही आपल्या नावावर केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी