मुंबई : भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटर म्हणून जेवढा महान आहे, तेवढा माणूस म्हणूनही खूप महान आहे. रस्त्यावर क्रिकेट खेळणे असो वा शाळेत जाऊन मुलांचे मनोधैर्य वाढवणे असो, त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. सचिन नेहमीच आपल्या साधेपणामुळे चर्चेत येत असतो. सध्या तो एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका रिक्षाचालकाशी मराठीत बोलताना दिसतो.
देशात लॉगडाऊन होण्यापूर्वी जानेवारी २०२० मधील असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की सचिन मुंबईमध्ये रस्ता चुकला आहे आणि त्याचवेळी एका रिक्षाचालकाने त्याला ओळखले. त्यामुळे त्याने सचिनला त्याच्या मागोमाग येण्यास सांगितले.
खरंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही रस्ते वन वे करण्यात आले आहेत. त्यामुळे सचिनला योग्य रस्ता मिळत नसल्याने तो त्या रिक्षाचालकाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या रिक्षाच्या मागे जात आहे, असे सचिन व्हिडिओमधून सांगतो.
तसेच सचिन कांदिवली पूर्वमध्ये रस्ता चुकला असल्याचेही या व्हिडिओतून कळते. यावेळी त्याने त्या रिक्षाचालकाशी मराठीतून संवाद साधला. तसेच सचिनने त्या रिक्षाचालकाला त्याचे नाव विचारले आणि त्याची विचारपूसही केली. त्या रिक्षाचालकाचे नाव मंगेश फडतरे असे आहे. यावेळी मंगेश सचिनला हायवेपर्यंत सोडतो असेही सांगतो.
मंगेशने सचिनशी संवाद साधताना असेही सांगितले की त्याची मुलगी सचिनची मोठी चाहती आहे. त्यावर सचिनने तिलाही हॅलो सांगा, असे सांगितले. मंगेशने सचिनला हायवेपर्यंत पोहचवण्यात मदत केल्यानंतर त्याने सचिनबरोबर एक सेल्फीही काढला. यावेळी सचिनने त्याच्यातील सभ्यतेचे दर्शन देत मंगेशला मागून येणाऱ्या गाड्यांकडे लक्ष द्या, सांभाळून राहा असेही सांगितले.
तसेच सचिनने मंगेशचे आभार मानले आणि आपल्या मार्गाने तो पुढे गेला. पुढे जाताना सचिनने अशीही कबुली दिली की त्याला एकट्याला हा रस्ता सापडला नसता.