सकाळी कोरोना पॉझिटिव्ह, संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह; सायना खेळणार

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी गेलेले भारताचे खेळाडू सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह झाले.

saina nehwal hs prannoy cleared to take part in thailand open
सकाळी कोरोना पॉझिटिव्ह, संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह; सायना खेळणार 

थोडं पण कामाचं

  • सकाळी कोरोना पॉझिटिव्ह, संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह; सायना खेळणार
  • सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉय यांचे पहिल्या फेरीचे सामने बुधवारी
  • जागतिक बँडमिंटन फेडरेशन आणि थायलंड बँडमिंटन फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर झाला निर्णय

नवी दिल्ली: थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी गेलेले भारताचे खेळाडू सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह झाले. यामुळे सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांचा थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन सहकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे क्वारंटाइन झालेल्या पारुपल्ली कश्यप यालाही थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा खेळता येणार आहे. (saina nehwal hs prannoy cleared to take part in thailand open)

याआधी सकाळी बँकॉकच्या प्रशासनाने सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय या दोघांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तोंडी सांगितले आणि तातडीने बँकॉकच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोना चाचणीचा अहवाल न देता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितल्याचे सायनाने ट्वीट करुन जाहीर केले. एचएस प्रणॉय यानेही थायलंडमधील कोरोना चाचण्यांच्या अनाकलनीय गुप्ततेविषयी संशय व्यक्त केला. 

कोरोना चाचणीचा अहवाल पाच तासांत सादर होईल, असा दावा करत बँकॉक प्रशासनाने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या. प्रत्यक्षात तगडे आव्हान देऊ शकणाऱ्या खेळाडूंनाच कोरोना पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आले. अहवाल न देता खेळाडूंना बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आणि त्यांच्या सोबत आलेल्यांना क्वारंटाइन करणे यावरच भर देण्यात आला. हा प्रकार सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांच्या ट्वीटमुळे उघड झाला. यानंतर वेगाने चक्र फिरली. सकाळी कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांना संध्याकाळी कोरोना निगेटिव्ह जाहीर करण्यात आले.

सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय बुधवारी पहिल्या फेरीचे सामने खेळणार

'कोरोना गेम'मुळे स्पर्धेचे नियोजन पुरते गडबडले. ज्या खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे तसेच क्वारंटाइन असल्यामुळे खेळता येणार नव्हते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सकाळीच थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात आल्याचे जाहीर झाले होते. मात्र खेळाडू कोरोना निगेटिव्ह असल्याचे जाहीर झाल्यानंतर आधीचा निकाल फिरवण्यात आला. पहिल्या फेरीचे वॉकओव्हर (थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्याचा निर्णय) रद्द झाले आणि उद्या (बुधवार) पहिल्या फेरीचे सामने होतील असे जाहीर करण्यात आले. यामुळे सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉय यांचे पहिल्या फेरीचे सामने बुधवारी होतील आणि त्यातील विजेत्यालाच दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळेल. 

आधी बँकॉक प्रशासनाने सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय या दोन खेळाडूंना तसेच जर्मनीच्या जोन्स जान्सेन या तीन खेळाडूंना कोरोना पॉझिटिव्ह जाहीर केले होते. तसेच पारुपल्ली कश्यप याला क्वारंटाइनमध्ये ठेवले होते. यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश दिल्याचे जाहीर झाले होते. जागतिक बँडमिंटन फेडरेशन आणि थायलंड बँडमिंटन फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर स्पर्धेच्या नियोजनात बदल करण्यात आला. तसेच कोरोना तपासणीत हलगर्जीपणा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना थायलंड बँडमिंटन फेडरेशनने संबंधितांना दिल्या.

थायलंडमध्ये ४ हजार ३५ कोरोनाबाधीत रुग्णांवर सुरू आहेत उपचार

थायलंडमध्ये ताज्या आकडेवारीनुसार १० हजार ८३४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ६७ जणांचा कोरोनाममुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६ हजार ७३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. थायलंडमध्ये सध्या ४ हजार ३५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी