भारत (India) आणि बांगलादेशदरम्यान (Bangladesh) 2004मध्ये झालेली एकदिवसीय मालिका खूप खास आहे. यातूनच भारताला धोनीसारखा (Mahendra Singh Dhoni) यष्टिरक्षक (wicketkeeper) मिळाला. मात्र याच मालिकेमध्ये एका भारतीय क्रिकेटपटूची कारकिर्दही संपली. तेही अशावेळी जेव्हा त्याने हातातून गमावलेला एक सामना गांगुली (Saurav Ganguly), सेहवाग (Virendra Sehwag), युवराज (Yuvraj Singh) आणि धोनीसारख्या दिग्गजांपेक्षाही जास्त धावा काढून विजयश्रीकडे झुकवला. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि पार्ट टाईम फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम (Shridharan Shriram) हा तो खेळाडू. त्याचा जन्म 21 फेब्रुवारी रोजी चेन्नई (Chennai) इथे झाला. त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळण्यास सुरुवात केली आणि भारतीय अंडर-19 संघात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यात 29 गडी बाद केले. नंतर त्याने फलंदाजीतही आपली जादू दाखवली. 1999-2000च्या घरच्या सीझनमध्ये 5 शतकांच्या सहाय्याने त्याने भारतीय संघात प्रवेश मिळवला.
19 मार्च 2000 रोजी नागपूरमध्ये श्रीरामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, मात्र त्याच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडला आणि त्याला फक्त 12 धावा काढता आल्या. या सामन्यात भारताचा पराभव झाला. यानंतर त्याच वर्षी त्याला आणखी 5 सामन्यांमध्ये संधी मिळाली, मात्र प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला आणि त्याला फक्त 21 धावा काढता आल्या. नंतर मात्र त्याला 4 वर्षी प्रतीक्षा करावी लागली.
4 वर्षांनी बांगलादेशच्या मालिकेत त्याला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने फक्त 3 धावा काढल्या, पण तीन गडीही बाद केले. याच आधारावर त्याला पुढील सामन्यातही संधी देण्यता आली ज्यात त्याने संघासाठी सर्वाधिक 57 धावा काढल्या आणि एक विकेट घेतली. मात्र भारताने सामना गमावला. संघासाठी सर्वात चांगले प्रदर्शन करूनही त्याला पुढच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही आणि यानंतर त्याने पुन्हा कधीही भारतीय संघाची निळी जर्सी परिधान केली नाही.
2007 साली सुभाष चंद्रा यांच्या बंडखोर टी-20 क्रिकेट लीग, इंडियन क्रिकेट लीगमध्ये सामील झालेल्या काही खेळाडूंमध्ये श्रीरामचा समावेश होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बंदी आणली. मात्र दोन वर्षांनी त्याला माफ करण्यात आले आणि नंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाचा भागही झाला, मात्र तिथेही त्याला यश आले नाही.
नंतर श्रीरामने प्रशिक्षणक्षेत्रातही जम बसवण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी थेट ऑस्ट्रेलिया गाठले. 2015मध्ये तो ऑस्ट्रेलियन ए संघाचा फिरकी गोलंदाजीचा सल्लागार झाला. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनावर आपल्या कामगिरीने चांगलीच छाप सोडली. त्यामुळे हळूहळू तो ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा भाग झाला आणि 2019मध्ये विश्वचषक, एशेस मालिका आणि भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यान कांगारूंच्या प्रशिक्षण स्टाफचा भाग होता.