राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : मुंबई क्लासिकवर पुणेकरांचे वर्चस्व, तीन गटात मारली बाजी

राजोल संजय पाटील यांच्या दिना बामा पाटील प्रतिष्ठान आयोजित मुंबई क्लासिक 2022 (Mumbai Classic 202) राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (Bodybuilding) स्पर्धेत पुणेकरांनी बाजी मारली आहे. स्पर्धेत महाराष्ट्र श्री (Maharashtra Shri)विजेता चव्हाणांचा महेंद्रच बाहुबली ठरला. राज्यभरातून आलेल्या शेकडो स्पर्धकांच्या अटी-तटीच्या लढतीत मुंबई आणि उपनगरच्या तगड्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक किताबावर आपले नाव कोरले.

State Level Bodybuilding Competitio
महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक 2022 चा मिळवला किताब   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  राजोल संजय पाटील यांच्या दिना बामा पाटील प्रतिष्ठान आयोजित मुंबई क्लासिक 2022 (Mumbai Classic 202) राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (Bodybuilding) स्पर्धेत पुणेकरांनी बाजी मारली आहे. स्पर्धेत महाराष्ट्र श्री (Maharashtra Shri)विजेता चव्हाणांचा महेंद्रच बाहुबली ठरला. राज्यभरातून आलेल्या शेकडो स्पर्धकांच्या अटी-तटीच्या लढतीत मुंबई आणि उपनगरच्या तगड्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक किताबावर आपले नाव कोरले. भारत श्री सागर कातुर्डेच्या अनुपस्थितीत महेंद्रसमोर एकाही खेळाडूचे आव्हान आज टिकले नाही.

मुंबई क्लासिकच्या निमित्ताने भांडुप पश्चिमेला अक्षरश: पीळदार खेळाडूंचे झुंड पाहायला मिळाले. लाला शेठ कंपाऊंडमध्ये हजारो क्रीडाप्रेमींच्या उत्साहवर्धक उपस्थितीत पार पडलेल्या या क्लासिकल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची पीळदार श्रीमंती अनुभवायला मिळाली. 134 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपल्या आखीव रेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन केलं. शरीरयष्टी दाखवणाऱ्या खेळाडूंवर आयोजिका राजोल संजय पाटील यांनी अक्षरश: चार लाखांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली. या स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूला जुलैमध्ये होणाऱ्या आशिया श्री स्पर्धेची दारे उघडणार असल्यामुळे राज्यभरातून जोरदार तयारीत असलेल्या खेळाडूंची उपस्थिती लाभली.

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना मुंबई क्लासिकच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळाले. स्पर्धा फक्त सात गटात असली तरी प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू उतरले होते. पहिल्या चार गटात तर अव्वल पाच खेळाडू निवडताना पंचांना डोळ्यात तेल घालून आपला निकाल नोंदवावा लागत होता. स्पर्धा मुंबईत असली तरी या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि ठाण्यातील खेळाडू आपली करामत दाखवत होते. 55 किलो वजनी गटात अव्वल स्थानासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या अवधूत निगडेने मुंबईकर नितीन शिगवणला मागे टाकत यश संपादले. 60 किलो वजनी गटात सातारचा रामा मायनाक पहिला आला तर 65 किलो वजनी गटात पुणेकर सूरज सूर्यवंशी अव्वल ठरला.

या गटात पहिल्या पाच क्रमांकात मुंबई आणि उपनगरचा एकही खेळाडू बसला नाही. मात्र स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले ते मुंबईकर संदीप सावळेने. त्याने 70 किलो गटात केवळ अव्वल स्थान मिळविले नाही तर त्याच्या देहयष्टीसमोर सारेच खुजे वाटत होते. 75 किलो गटात पुण्याचाच तौसिफ मोमीन पहिला आला. मुंबईला एकमेव गट विजेतेपद मिळवून दिले ते गणेश पेडामकरने. 80 किलो वजनी गटात त्याने मुंबईच्याच भास्कर कांबळी आणि आशीष लोखंडेवर मात केली. सर्वात मोठ्या गटात महेंद्र चव्हाणसमोर सुशांत राजणकर आणि निलेश दगडे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

महाराष्ट्राच्या संघासाठी दहा जणांची निवड

जुलै महिन्यात होत असलेल्या आशिया श्री स्पर्धेसाठी येत्या 22 मेला हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवड चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीसाठी आज झालेल्या मुंबई क्लासिकमधून दहा तगड्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. त्यात विजेता महेंद्र चव्हाण, उपविजेता संदीप सावळेसह गणेश पेडामकर, अवधूत निगडे, रामा मायनाक, तौसिफ मोमीन, भास्कर कांबळी, आशीष लोखंडे, सुशांत रांजणकर आणि निलेश दगडे यांची वर्णी लागली. हे दहा खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी