ENG vs NZ Test Series | नवी दिल्ली : सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने (Joe Root) रविवारी न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी धमाकेदार शतकीय खेळी केली. रूटने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २७ वे शतक ११६ चेंडूत पूर्ण केले आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो १६३ धावांवर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. (Strong century by Joe Root Breaking the record of Sunil Gavaskar and Younus Khan).
अधिक वाचा : ...म्हणून महिलांच्या शर्टचे बटण डावीकडे असते
लॉर्ड्सवर शतक झळकावताच जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा जगातील १४वा फलंदाज ठरला आहे, नॉटिंगहॅममधील शतकादरम्यान पाकिस्तानचा युनूस खान आणि भारतीय दिग्गज सुनील गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये होते. लक्षणीय बाब म्हणजे रूटने या दिग्गजांना मागे टाकत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रूट आता स्टीव्ह वॉच्या मागे १२ व्या क्रमांकावर आहे. युनूस खानने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११८ सामन्यांत १०,०९९ धावा केल्या होत्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या सुनील गावस्कर यांनी १२५ कसोटींमध्ये १०,१२२ धावा केल्या होत्या. जो रूटने ११९* कसोटी सामन्यांच्या २१९ डावांमध्ये ५०.३८ च्या सरासरीने एकूण १०,१७८* धावा केल्या आहेत. रुटच्या पुढे ११ व्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह वॉने १७८ कसोटीत १०,९२७ धावा केल्या आहेत. मात्र हा आकडा पार करण्यासाठी रूटला आणखी काही कालावधी प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.
लक्षणीय बाब म्हणजे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतरच रूटने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा संघाचा माजी कर्णधार जो रूटने ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. जो रूट ८८२ गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता तो लाबुशानेला मागे टाकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.