सुरेश रैनाच्या आत्याच्या नवऱ्याची पठाणकोटमध्ये हत्या, आत्याची प्रकृती चिंताजनक

Suresh Raina: नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या आत्याच्या पतीची शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suresh_raina
रैनाच्या आत्याच्या नवऱ्याची हत्या, आत्याची प्रकृती चिंताजनक  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२० मधून बाहेर पडला
  • रैनाच्या अचानक परत येण्याचे नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही  
  • एमएस धोनीनंतर १५ ऑगस्ट रोजी रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयपीएल २०२० मध्ये सहभाग होण्यासाठी दुबईला गेलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) शनिवारी अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक कारणांमुळे रैना मायदेशी परतत आहे आणि संपूर्ण हंगामात तो बाहेर पडला आहे. असं ट्वीट सीएसकेने अधिकृतपणे केलं आहे. मात्र, रैनाने अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप कुणालाच समजू शकलेलं नव्हतं. 

दरम्यान, 'दैनिक जागरण' यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुरेश रैना यांच्या नातेवाईकांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री पठाणकोटमधील माधोपूर भागातील थरियाळ गावात अज्ञात लोकांनी सुरेश रैना यांच्या आत्याच्या घरावर हल्ला केला. ज्यात आत्याच्या नवऱ्याची हत्या झाली. तर आत्या गंभीर जखमी झाली. या रिपोर्टनुसार, हा हल्ला १९ ऑगस्टच्या रात्री करण्यात आला होता. तेव्हा हे सर्वजण घराच्या छतावर झोपले होते. त्याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात सुरेश रैना याच्या वडिलांची बहीण आशा देवी (वय ५५) यांची प्रकृती चिंताजनक असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. दुसरीकडे या घटनेत सुरेश रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार (वय ५८) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सुरेश रैनाचा आत्येभाऊ कौशल कुमार (वय ३२) आणि अपिन कुमार (वय २४) यांनाही गंभीर दुखापत झाली होती. परंतु अपिन कुमार आणि त्याची आजी सत्या देवी (वय 80) हे बरे झाले असून रुग्णालयातून घरी परतले.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज  (२९ ऑगस्ट) ट्विटरवर जाहीर केलं. 'सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे आणि आयपीएलच्या उर्वरित हंगामात उपलब्ध होणार नाही. यावेळी चेन्नई सुपरकिंग्ज सुरेश आणि त्याच्या कुटुंबीयांशी पाठिशी आहे.'

रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना कसोटीमध्ये २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ५,६१५ आणि टी-20 मध्ये २९.१८ च्या सरासरीने १,६०५ धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी ७ शतके आणि ४८ अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान, तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने गोलंदाजी करताना कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये १३-१३ आणि एकदिवसीय सामन्यात ३६ बळी घेतले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी