T20 World Cup: मोठी बातमी... विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर, श्रीलंकेचा पराभव कांगारुंना पडला महागात

T20 World Cup Eng vs SL: इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव करून T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. या सामन्याच्या निकालामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठता आली नाही आणि त्यांच्याच भूमीवर टी-20 विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

t20 world cup england reached semi finals by beating sri lanka broke australias dream
मोठी बातमी... विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर, श्रीलंकेचा पराभव कांगारुंना पडला महागात   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत
  • ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतच गारद
  • विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतच ऑस्ट्रेलियाला बसला मोठा झटका

T20 World Cup Eng vs SL: सिडनी : इंग्लंडने श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली, मात्र पहिली विकेट गमावल्यानंतर विजयी लक्ष्य गाठताना त्यांची बरीच दमछाक झाली. 7.2 षटकांत 75 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर इंग्लंड संघाने 111 धावांत 5 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले. पण बेन स्टोक्सच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने 19.4 षटकांत विजयी लक्ष्य गाठलं. या सामन्यात आदिल रशीदला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (t20 world cup england reached semi finals by beating sri lanka broke australias dream)


ऑस्ट्रेलिया पहिल्या फेरीत बाहेर

श्रीलंकेच्या पराभवामुळे यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच महागात पडला आहे. ऑस्ट्रेलियासोबत सात गुणांनी बरोबरी साधली असली तरी निव्वळ रनरेटच्या बाबतीत ते पहिल्या फेरीत विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. सुपर-12च्या ग्रुप-1 मध्ये न्यूझीलंड पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.

अधिक वाचा: T20 World Cup 2022 : टीम अफगानिस्तान हरली, पण ऑस्ट्रेलियाची जिरवूनचं मैदान सोडलं

इंग्लंडच्या बटलर आणि हेल्सची झंझावाती सुरुवात

जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने झंझावाती सुरुवात करून संघाला 31 चेंडूत अर्धशतकांचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडने 6 षटकांत 70 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या वनिंदू हसरंगाने जोस बटलरला बाद करून श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करुन दिलं. बटलरने 23 चेंडूत 28 धावा केल्या. यानंतर अॅलेक्स हेल्सही हसरंगाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 30 चेंडूत 47 धावा केल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ICC (@icc)

स्टोक्समुळे इंग्लंड उपांत्य फेरीत

82 धावांत दोन गडी गमावल्यानंतर बेन स्टोक्सने एक बाजू लावून धरली. एकीकडे विकेट पडत असतानाही स्टोक्स मात्र संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेत होता. हॅरी ब्रूक आणि मोईन अली हे झटपट   बाद झाल्याने इंग्लंडच्या अडचणीत भर पडली होती. त्यावेळी इंग्लंडचा स्कोअर 14.3 षटकांत 5 गडी बाद 111 होता. तर 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅम कुरन हा देखील लाहिरू कुमाराचा बळी ठरला.

अधिक वाचा: T20 World Cup 2022: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला हा पहिला संघ

मात्र, यानंतर इंग्लंडने आणखी पडछड होऊ दिली नाही आणि संयमी खेळ करत स्टोक्सने आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. यावेळी स्टोक्स 36 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला आणि त्याला ख्रिस वोक्सने साथ दिली. तो 3 चेंडूत 5 धावा करून नाबाद राहिला.

श्रीलंकन फलंदाज अपयशी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. पथुम निशांक व्यतिरिक्त श्रीलंकेचा दुसरा कोणताही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. निशांकने 45 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय भानुका राजपक्षे 22 आणि कुशल मेंडिस यांनी 18 धावा केल्या. 

श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. आदिल रशीदने मधल्या षटकांमध्ये दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेचा धावगती नियंत्रणात ठेवली, अशा परिस्थितीत विकेट पडत राहिल्या आणि श्रीलंकेचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मार्क वुड इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 26 धावांत 3 बळी घेतले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी