'धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर नाही', पाहा आताच आलेली ही नवी बातमी

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 22:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shikhar Dhawan Injury Update: विश्वचषक स्पर्धेतून शिखर धवन बाहेर जाणार अशी चर्चा सुरु असताना आता त्याच्याबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या नेमकी बातमी काय.. 

dhawan_bcci
'धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर नाही', पाहा आताच आलेली ही नवी बातमी (फोटो सौजन्य: BCCI) 

लंडन: विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आहे. सलामीवीर शिखर धवन हा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जाणार अशी बातमी समोर आली होती पण आज संध्याकाळी शिखर धवनच्या दुखापतीवर फायनल रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये त्याच्या अंगठ्याला हेअरलाइन फॅक्चर असल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टनंतर बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला आहे की, शिखर धवन टीमसोबतच राहिल. पण तो संपूर्ण वेळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असणार आहे. याबाबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीटही केलं आहे. याआधी अशी चर्चा सुरु होती की, दुखापतीमुळे शिखर धवन हा विश्वचषकातून बाहेर जाईल. तसंच त्याच्या जागी अंबाती रायडू किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला संधी मिळू शकते. 

धवनच्या अंगठ्याला झालेलं फॅक्चर कितपत गंभीर आहे हे रिपोर्टशिवाय टीम मॅनेजमेंटला कळू शकत नव्हतं. पण आज आलेल्या रिपोर्टनुसार धवनची दुखापत फारशी गंभीर नसली तरी त्याला पुरेशी काळजी मात्र घ्यावी लागणार आहे. कारण त्याची ही दुखापत काही दिवसात ठीक होऊ शकते. त्यामुळे तो पुन्हा एकदा प्लेईंग इलेव्हनमध्ये सुद्धा येऊ शकतो. पण असलं तरीही पुढील काही सामने मात्र त्याला गमवावे लागणार आहेत. 

जर पुढील एक आठवड्यापर्यंत धवनच्या दुखापतीमध्ये फार काही बदल झाला नाही तर त्याच्या जागी ऋषभ पंतला बोलवलं जाण्याची शक्यता आहे. पण सध्या टीम मॅनेजमेंटने असा निर्णय घेतला आहे की, शिखरला संघात सोबतच ठेऊन त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्याची संधी द्यायची. ज्यामुळे तो बरा झाल्यानंतर पुन्हा भारतीय संघात परत येऊ शकतो. 

पण असं असलं तरीही पुढील दोन सामने भारतासाठी खूपच मोठे आहेत. पहिला सामना हा न्यूझीलंडसोबत तर दुसरा सामना पाकिस्तानसोबत आहे. दुखापतीमुळे या दोन्हीही सामन्यात शिखर धवन खेळण्याची शक्यता ही कमीच आहे. त्यामुळे आता शिखर धवनऐवजी संघात कुणाला संधी मिळणार आणि सलामीला कोण येणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन हा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला होता. एका बाऊंसर चेंडूवर त्याच्या डाव्या हाताच्या अंगठाला दुखापत झाली होती. पण तरीही दुखापतीकडे दुर्लक्ष करत शिखरने या सामन्यात शतक झळकावलं. त्यावेळ त्याने १०९ चेंडूत ११७ धावा केल्या होत्या. धवनच्या या शानदार खेळीच्या जोरावरच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना ३६ धावांनी जिंकला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी